शेतकरी कर्जमाफीत दीड कोटीचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:04 AM2019-07-16T05:04:36+5:302019-07-16T05:04:41+5:30
शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.
नागपूर : सरकारी अधिकारी व गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार यांनी संगनमत करून शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला असा आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. सहकार आयुक्तांकडे योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी कर्जमाफीचे प्रस्ताव पडताळण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यानंतर संगनमताने हा घोटाळा करण्यात आला असे बडोले यांचे म्हणणे आहे. बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज सादर करून कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या सावकारांची यादी मागितली होती. त्यातून कर्जमाफी योजनेत घोटाळा झाल्याचे दिसते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेत सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त, विभागीय आयुक्त, गोंदिया जिल्हाधिकारी आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.