इथेही शेतकऱ्याची लुबाडणूक; ग्राहक मागेल त्या भावाला भाजी दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:48 AM2020-04-03T10:48:13+5:302020-04-03T10:48:35+5:30
महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बहुतेक शेतकऱ्यांनी यापूर्वी अशा पद्धतीने कधीच भाजी विकलेली नाही. या संदर्भात त्यांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले नाही. त्यामुळे ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
सकाळच्या सुमारास फुले मार्केट, कॉटन मार्केटमधील भाजीबाजार एका तासासाठी सुरू ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो बंद करण्यात आला. ताजी भाजी न मिळाल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले. दुसरीकडे कळमना बाजार सुरू होता. मात्र ग्राहकच नसल्याने तो बंद करावा लागला. महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला असला तरी, तो अयशस्वी ठरला. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात आणलेली भाजी परत नेऊनही खराबच होणार असल्याने ग्राहक मागतील त्या भावाने अनेक शेतकºयांना विक्री करावी लागली.
महात्मा फुले भाजी बाजार अडते (दलाल) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांच्या मते, शहरातील विविध भागांमध्ये भाजीबाजार सुरू केल्याने जुना बाजार बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. ही व्यवस्था सुरू करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांच्या मेहनतीचे योग्य दाम मिळावे यासाठी शेतकऱ्यांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी होती. शहरातील सर्व मुख्य भाजीबाजार, उपबाजारसुद्धा सुरू ठेवले तर नागरिकांना ताजा भाजीपाला योग्य दरात मिळू शकेल. वाढणारी गर्दीही नियंत्रित करता येऊ शकेल. त्यामुळे शहरातील सर्व भाजी बाजार सुरू करावेत, अश्ी मागणी महात्मा फुले भाजी बाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दिवसभर विक्रीची सवय नाही
राम महाजन म्हणाले, शेतकरी शेतातील भाजीपाला दलालांना विकतात, दलाल दिवसभर बसून चिल्लर विक्रेत्यांना विकतात तसेच दिवसभर विक्री करतात. शेतकऱ्यांना ही सवय नाही. त्यांच्याकडे यासाठी वेळही नाही. यामुळेच शेतकऱ्यांना बराच त्रास सहन क रावा लागला.