शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून नोंदविला निषेध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:08 AM2021-01-14T04:08:13+5:302021-01-14T04:08:13+5:30
नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी नागपुरात शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यात ...
नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी नागपुरात शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकारात दुपारी २.१५ वाजता संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कसलाही विचार न करता तीन कायदे केले. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि हे कायदे सरकारने मागे घ्यावे, यासाठी हे आंदोलन असल्याचे अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीचे संयोजक अरुण वनकर यांनी सांगीतले.
यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना दिलेल्या स्थगितीचेही आंदोलकांनी स्वागत केले. स्थापन केलेली चार सदस्यीय समितीचे सदस्य शेतकरीविरोधी असल्याने त्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मत व्यक्त केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे डॉ. युगल रायलू, संजय राऊत, रवींद्र टेंभुर्णे, जयश्री चहांदे, पी. आर. तायडे, जय जवान जय किसान संघटनेचे सी. मिश्रा, विठ्ठल बिरडे, अ. भा. किसान सभेचे अरुण लाटकर, मनोहर मुळे, अंजली तिरपुडे, रामेश्वर चरपे, अविनाश बढे, अशोक वडनेरकर, विलास जांभूळकर, मदन भगत, मारोती वानखेडे यांच्यासह महिला-पुरुष सहभागी होते.