नाफेडच्या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:44+5:302021-05-22T04:08:44+5:30
भिवापूर: नाफेडची हरभरा खरेदी एप्रिल महिन्यात सुरू झाली. मात्र मार्केटमध्ये भाव चांगला मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीकडे ...
भिवापूर: नाफेडची हरभरा खरेदी एप्रिल महिन्यात सुरू झाली. मात्र मार्केटमध्ये भाव चांगला मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरविली होती. आता मात्र चित्र उलटे झाले आहे. नाफेडच्या तुलनेत मार्केटचे भाव उतरले आहे. यात ४०० रुपयाचा फरक आहे. त्यामुळे गत दोन दिवसापासून नाफेडच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाफेडच्या खरेदीसाठी तालुक्यातील ७६२ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. एप्रिल महिन्यात खरेदी विक्री संस्थेमार्फत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले. यादरम्यान नाफेडकडून मिळणाऱ्या ५,१०० रुपये भावाच्या तुलनेत मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव चांगला होता. त्यामुळे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी नाफेडला पाठ दाखवीत मार्केटमध्ये हरभरा विक्री सुरू केली. एप्रिल महिन्यात नाफेडकडे केवळ १० शेतकऱ्यांचा ११३.५० क्विंटल हरभरा विक्रीकरिता आला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे मार्केटची दारे बंद झाली. मात्र भाव चांगला मिळत असल्याने अनेक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केट उघडण्याची प्रतीक्षा करत उत्पादित हरभरा घरातच साठवून ठेवला. आता मे महिन्याच्या सुरुवातीस मार्केटची दारे उघडी झाली आहेत. मात्र नाफेडच्या तुलनेत भाव घसरला आहे. गत दोन दिवसापासून मार्केटमध्ये हरभऱ्याचा भाव ४,७०० पर्यंत उतरला आहे. मात्र नाफेडकडून मिळणारा ५,१०० रुपये भाव ‘जैसे थे’च आहे. यात तब्बल ४०० रुपयाचा फरक असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नाफेडच्या खरेदीला पसंती दिली आहे. एप्रिल व मे महिन्याच्या सुरुवातीस ओसाड असलेले नाफेडचे खरेदी केंद्र गत दोन दिवसापासून शेतकरी व हरभऱ्याच्या पोत्यांनी गजबजून गेले आहे.
---
नाफेडच्या खरेदीसाठी ७६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गत दोन-चार दिवसापासून शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ३१ शेतकऱ्यांचा ४४२ क्विटंल हरभरा नाफेडने खरेदी केला आहे. स्थानिक एमआयडीसीच्या गोडाऊनमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र सुरू आहे. संसर्गजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- सुरेश नागोसे, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था, भिवापूर.