ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीचा फायदा होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:55+5:302021-09-02T04:16:55+5:30
खापा: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने महाटीबीटी पोर्टलच्या माध्यमातून योजना राबविणे सुरू केले ...
खापा: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने महाटीबीटी पोर्टलच्या माध्यमातून योजना राबविणे सुरू केले आहे. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, नोंदणी करण्याची पद्धत कशी असते, पोर्टलवर कोणत्या कालावधीत अर्ज करावा लागतो, याबाबत काही शेतकरी अद्यापही जागरुक नाहीत. यासोबतच प्रत्येक शेतकरी ॲन्ड्राॅईड मोबाईल फोन वापर नसल्याने कृषी विभागाच्या या योजना काही ठरावीक शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज खापा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी सहायक व मंडळ अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती देतात. मात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकतात. तसे न करता तालुकास्तरावर यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी अश्विनी कोरे यांना विचारणा केली असता, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्याची शासकीय योजनेसाठी निवड होते, असे सांगितले. मात्र ज्यांना हे कार्य शक्य नाही, त्यांनी कुठे जायचे याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही.