कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:26+5:302021-03-16T04:09:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : लाॅकडाऊनच्या भीतीने शेतकऱ्यांच्या मनात घर केले आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : लाॅकडाऊनच्या भीतीने शेतकऱ्यांच्या मनात घर केले आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस तातडीने विकायला काढला आहे. सावनेर तालुक्यात कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी जिनिंग-प्रेसिंगला व व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहेत. त्यामुळे जिनिंग-प्रेसिंगच्या आवारात कापसाच्या गाड्यांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे कापूस विक्रीची गंभीर समस्या निर्माण झाली हाेती. खुल्या बाजारात कापसाला कमी भाव असल्याने शेतकऱ्यांना सीसीआय व कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विकावा लागला. या केंद्रांवर नाेंदणी केल्यानंतरही नंबर यायला बराच विलंब लागला. नंबर आल्यानंतर केंद्रावर दाेन ते चार दिवस कापसाच्या गाड्या रांगेत उभ्या ठेवाव्या लागल्या हाेत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात लाॅकडाऊनची चांगलीच धास्ती निर्माण झाली.
काही दिवसापासून काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने नागपूर शहरात लाॅकडाऊन जाहीर केले. रुग्णसंख्येचा वाढता वेग कायम राहिल्यास ग्रामीण भागातही लाॅकडाऊन जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाॅकडाऊन काळात कापसाची विक्री करणे शक्य हाेणार नाही किंवा करता आली तर ती अत्यंत त्रासदायक ठरेल, याच जाणिवेमुळे त्यांनी कापसाच्या विक्रीसाठी धापवळ सुरू केली. परिणामी, सावनेर तालुक्यातील बहुतांश जिनिंग-प्रेसिंगच्या आवारात कापसाच्या वाहनांची गर्दी व धर्मकाट्यावर माेजमाप करण्यासाठी रांगा दिसून येत आहे.
...
शासकीय कापूस खरेदी बंद
सावनेर तालुक्यात कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले हाेते. सुरुवातीच्या काळात कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रावर कापसाची विक्री केली. या केंद्रावर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५,७५० रुपये भाव देण्यात आला. या हंगामासाठी शासनाने लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,८२५ रुपये जाहीर केली असताना, या केंद्रावर ७५ रुपये प्रति क्विंटल भाव कमी देण्यात आला. मध्यंतरी कापसाचे भाव प्रति क्विंटल ६,१०० रुपयावर पाेहाेचले. त्यामुळे कापूस पणन महासंघ व सीसीआयने कापूस खरेदी लगेच बंद केली. ही खरेदी बंद केल्याने शासनाने बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणली.