शेतकरी कर्जमुक्त व्हावा

By admin | Published: September 2, 2015 04:51 AM2015-09-02T04:51:44+5:302015-09-02T04:51:44+5:30

दुष्काळ, अतिवृष्टी व नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला आहे.

Farmers should be free from debt | शेतकरी कर्जमुक्त व्हावा

शेतकरी कर्जमुक्त व्हावा

Next

नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी व नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला आहे. जगाचा हा पोशिंदा आज आधारहीन झाला आहे, खचला आहे. त्याला आत्मिक बळाची गरज आहे. आज कृषी तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली आहे. मात्र विदर्भातील शेतकरी हा त्यापासून कोसो दूर आहे. अशा या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करू न, येथील प्रत्येक शेतकरी हा कर्जमुक्त व्हावा, असा संकल्प अ‍ॅग्रिकोज वेलफेअर फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’च्या मंचावर व्यक्त केला.


विशेष म्हणजे, मागील ३० ते ३५ वर्षे महसूल,पोलीस, कृषी, बँका व कायदा अशा विविध क्षेत्रात उच्च पदांवर काम केलेल्या सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा फोरम उभा केला आहे. सध्या या फोरममध्ये २२० सदस्य असून, येत्या काहीच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात या फोरमचे सदस्य तयार होतील, असा विश्वास यावेळी फोरमचे अध्यक्ष व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकरी आज चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करू न, नि:शुल्क मार्गदर्शन करणे, हा फोरमचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. शिवाय विदर्भातील शेतकरी हा आत्महत्या का करतो, याचे मूळ शोधण्याची गरज आहे. या फोरममधील प्रत्येक पदाधिकारी व सदस्य हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. शिवाय तो स्वत: कृषी पदवीधर आहे. त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्याचे दु:ख, समस्या व त्यांच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. आज फोरमच्या प्रत्येक सदस्याकडे शेतीचे ज्ञान आहे, अनुभव आहे. ते ज्ञान व अनुभव फोरमच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविणे काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी फोरम विशेष प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर काढण्याची गरज आहे. शेडनेट, पॉलिहाऊस, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन व हार्वेस्टिंगच्या नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख करू न देणे आवश्यक आहे. यासाठी फोरम वेगवेगळ्या विषय समित्या स्थापन करू न शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचा मानस यावेळी फोरमने व्यक्त केला. या चर्चेत फोरमचे अध्यक्ष बाबासाहेब कंगाले,उपाध्यक्ष आर.व्ही. तलांजे, सचिव व्ही.एम. तपाडकर, कोषाध्यक्ष पी.डब्ल्यू. पांढरे, सदस्य गंगाप्रसाद ग्वालबंशी, एस.एम. पानसे, एच.एम. भांडारकर,के.बी. ढोक यांनी भाग घेतला होता.(प्रतिनिधी)

असा आहे, फोरम
४अध्यक्ष बाबासाहेब कंगाले, ४उपाध्यक्ष आर. व्ही. तलांजे, ४सचिव व्ही. एम. तपाडकर,
४सहसचिव आर. एन. कळमकर, ४कोषाध्यक्ष पी. डब्ल्यू. पांढरे,
४सदस्य गंगाप्रसाद ग्वालबंशी, डॉ. एस. व्ही. सरोदे, जी. ए. देवळीकर, एस. एम. पानसे, एच. एम. भांडारकर, अ‍ॅड़ एस. के. देशपांडे, पी. के. जोशी, व्ही. जे. गोल्लीवार,के. बी. ढोक व एम. एन. तेप्पलवार यांचा सहभाग आहे.

‘शेती संशोधन केंद्रा’ची योजना
४फोरमने गोरेवाडाशेजारी एक सुसज्ज शेती संशोधन केंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, यासाठी फोरमचे पदाधिकारी गंगाप्रसाद ग्वालबंशी यांनी चार एकर जागा उपलब्ध करू न दिली आहे. सध्या या जागेवर संत्रा, मोसंबी, बोर, आवळा, सीताफळ, पेरू , आंबा, चिकू व डाळिंब यासारख्या तब्बल ४२ पेक्षा अधिक प्रकारची फळझाडे व औषधी वनस्पती उपलब्ध आहे. येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. याशिवाय या केंद्राचा कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही संशोधनासाठी उपयोग होणार आहे. फोरमच्या माध्यमातून येथे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे. अशा या सुसज्ज शेती संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा मिळणार असल्याचे यावेळी गंगाप्रसाद ग्वालबंशी म्हणाले.

शेडनेट-पॉलिहाऊस प्रकरणांचा
पाठपुरावा करणार
४सध्या विदर्भात गाजत असलेल्या शेडनेट, पॉलिहाऊस व औषधी वनस्पती लागवडीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या प्रकरणांचा फोरम स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी फोरमचे पदाधिकारी लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करेल. यानंतर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही यावेळी आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे पीडित शेतकरी अक्षरश: हादरले आहेत. त्यांच्या डोक्यावर लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर तयार झाला असून बँक ा कर्जासाठी तगादा लावत आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीकोज वेलफेअरसारख्या फोरमच्या पाठबळाची गरज आहे. याशिवाय फोरमने शेतकऱ्यांसाठी सीताबर्डी येथील नासुप्रच्या व्यावसायिक संकुलातील खोली क्र. २०९ येथे कार्यालय सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांना नि:शुल्क सल्ला दिला जाणार असून, त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे फोरमने आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
४फोरमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष भेटी देऊन, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी बाबासाहेब कंगाले यांनी सांगितले. ते म्हणाले, अलीकडे जैविक व सेंद्रिय शेतीवर फार मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून अशा नवीन तंत्रज्ञानाची व पीक पद्घतीची शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. कृषी विभागातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. कृषी सहायकाला सहा-सहा गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. शिवाय गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्यात कुठेही समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या शासकीय यंत्रणेचा आवश्यक तो फायदा होत नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Farmers should be free from debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.