शेतकऱ्यांनी बांबू शेतीतून मिळवावी समृद्धी : ६०० रोपट्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:27 PM2020-09-25T22:27:34+5:302020-09-26T20:15:00+5:30
देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात बांबूच्या १५० प्रजाती आहेत आणि मोठ्या संख्येत शेतकरी बांबू लागवडीकडे वळले आहेत. अॅग्रो फॉरेस्ट्री वृक्षारोपण हा शेतीचा नवा ट्रेंड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या ३० टक्के भागावर तरी बांबू लागवड करावी व समृद्धी प्राप्त करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनीच नाही तर बेरोजगार तरुणांनी बांबू शेतीतून रोजगार प्राप्त करावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूरच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त तीन दिवसाच्या बांबू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात वेगवेगळ्या उपक्रमातून शेतकऱ्यांना बांबू शेतीबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना बांबूच्या ६०० रोपट्यांचे वितरण करण्यात आले.
कृषी महाविद्यालयाच्या एआयसीआरपी येथे आयोजित हा महोत्सव सोशल फॉरेस्ट्री सर्कल, सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजन, नागपूर आणि एआयसीआरपी, पीडीकेव्ही कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर यांच्या वतीने करण्यात आला. कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. डी.एम. पंचभाई, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक गीता नन्नावरे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्ही.एम. इलोरकर, कृषी महाविद्यालय, अकोलाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. कचारे, केंद्रीय कृषी वन संशोधन संस्था, झांशीचे प्रकल्प संचालक डॉ. आर.के. तिवारी आणि वेगवेगळ्या भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते. क्रॉफ्ट इंडस्ट्रीपासून बांधकाम क्षेत्रापर्यंत असलेले बांबूचे महत्त्व यावेळी तज्ज्ञांनी समजावून सांगितले. बांबू लागवडीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. तीन दिवस हा महोत्सव चालला आणि या तीन दिवसात देशभरातील तज्ज्ञांनी विद्यार्थी व शेतकºयांना मार्गदर्शन केले.