पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये
By admin | Published: June 18, 2017 02:30 AM2017-06-18T02:30:21+5:302017-06-18T02:30:21+5:30
शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही
चंद्र्रशेखर बावनकुळे : सुलभ पीक कर्ज वाटप अभियानाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करताना सर्व बँकांनी पीक कर्जापासून कुणीही वंचित राहणार नाही याची खबरादारी घेतानाच सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज अभियानासंदर्भात अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा उपनिबंधक भोसले, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अयुब खान, तसेच महसूल विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्याला ८३० कोटी ९९ लक्ष रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले असून १५ जूनपर्यंत ३०६७८ शेतकरी सभासदांना ३२३ लाख रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३९ टक्के कर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महापीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून राज्यात सर्वात उत्कृष्ट कार्य करून जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरावर नावलौकिक कायम ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी खरीप पीक कर्ज वाटपासाठी दर शुक्रवारी तालुकास्तरावर पीक कर्ज वाटपासाठी मोहीम घेण्यात येत असून तालुक्यात एकाच दिवशी पीक कर्ज मेळावे करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन पीक कर्ज मेळावे पार पडले असून त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दीड हजार सोलरपंप ७५ टक्के अनुदानावर
शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप देण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर सोलरपंपाचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी केवळ २५ हजार रुपये देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलरपंप उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत असून सुमारे चार लक्ष रुपये किमतीचा सोलरपंप शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर म्हणजेच केवळ २५ हजार रुपये भरून वाटप करण्यात येणार आहेत. सोलरपंपामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलरपंप योजनेत सहभाग वाढवावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. या योजनेसाठी यापूर्वी पाच एकर शेतीची असलेली मर्यादा आता दहा एकरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
अतिवृष्टी व पावसामुळे बाधित होणारी गावे तसेच नदीकाठावरील पुराचा धोका असलेल्या गावामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.