शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:39+5:302021-05-13T04:09:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडत नाही. अनेकदा खतांची टंचाईसुद्धा जाणवते. यामुळे शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे, असा सल्ला कृषी अधिकारी देत आहेत.
रासायनिक खताचा वापर कमी करणे व संतुलित वापर हाेण्याच्या दृष्टीने खरीप हंगाम २०२१ मध्ये रासायनिक खत बचतीची विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे. १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करणे, हे उद्दिष्ट समाेर ठेवून रामटेक तालुक्यात ही माेहीम राबविली जात आहे.
धान, साेयाबीन, कपाशी, ऊस पीक वापरावर विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपीकता निर्देशांक दाखविणारा फलक लावणे व त्याचे सामूहिक वाचन करणे, जमीन आराेग्य पत्रिकेनुसार खताचा वापर करणे, जैविक खताची बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाण्यांचे अनुदानावर वितरण करणे, धान पिकावर युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषी सेवा केंद्र संचालक, चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ हाेण्यासाठी, उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपाेस्ट, गांडूळ खत, कंपाेस्ट खत, आदींचा वापर वाढवून रासायनिक खताची मागणी कमी करणे, विविव पीक याेजनेंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकाचे आयाेजन करणे, आदी बाबींचा प्रसार-प्रचार करण्याचे नियाेजन कृषी विभागाने केले आहे. या माेहिमेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.