शरद पवारांची गाडी अडवून शेतकऱ्यांनी दाखविली खराब पिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:02 PM2019-11-14T14:02:15+5:302019-11-14T14:02:46+5:30
विदर्भातील उध्वस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी रस्त्यात अडवून नागरिकांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भातील उध्वस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी रस्त्यात अडवून नागरिकांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखविली. गुरुवारी सकाळी शरद पवार यांचे नागपुरात आगमन झाले होते.
परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी पवार येथे आले आहेत. राज्यात राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात आले आहेत. डॉ. बाबासाहेब विमानतळावरून ते काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटी देणार आहेत. शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रपरिषदेला ते उपस्थित राहतील व नंतर एका कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री मुंबईकडे रवाना होणार आहेत.
शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकºयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. काटोल तालुक्यातील चारगाव येथील रवींद्र पुनवटकर या शेतकºयांच्या शेतात झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी पवारांसमोर आपापल्या समस्या मांडल्या. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतातीतल कापूस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत.