शेतकऱ्यांनी थांबविल्या पेरण्या : २२,००० क्विंटल बियाण्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 07:57 PM2018-06-12T19:57:27+5:302018-06-12T20:04:02+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाहीर केले आहे. सदर वाण शेतकऱ्यांना अनुदानावर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या थांबविल्या आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना बाजारातून विविध कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाहीर केले आहे. सदर वाण शेतकऱ्यांना अनुदानावर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या थांबविल्या आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना बाजारातून विविध कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे.
मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीस इच्छुक आहे. गेल्यावर्षी कापसावर बोंडअळीचा झालेला परिणाम यामुळे शेतकऱ्यांचा यावर्षी सोयाबीनकडे कल आहे. कृषी विभागाच्या नियोजनात सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यावर्षी सोयाबीन एक लाख हेक्टरवर पेरण्यात येईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या अनुदानावर मिळणाऱ्या वाणाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात १४ हजार क्विंटल सोयाबीनच्या वाणाला अनुदान देण्यात आले होते. यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला असतानाही केवळ २२७० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्यात आले आहे. महाबीजच्या ९५३० या वाणासाठी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते. यात केंद्राचे ६० आणि राज्याचा वाटा ४० टक्के असतो. परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने आपला वाटा दिला नसल्याने कृषी विभागाने अनुदान जाहीर केले नाही. जिल्ह्यात किमान २२ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यानी अनुदानाच्या प्रतीक्षेत पेरण्या थांबविल्या आहेत.
शेतकऱ्यांची भटकंती, बियाण्यांच्या दुकानावर फलक
ग्रामीण भागातील बियाण्यांच्या दुकानावर अनुदानित बियाणे उपलब्ध नाही, असे फलक लावलेले आहेत. अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. महाबीजने बियाणे बाजारात उपबल्ध केले आहे. परंतु शासनाकडून अनुदानासंदर्भात कुठलेही पत्र नसल्यामुळे अनुदानावर बियाण्यांची विक्री थांबविली आहे.
डीपीसीतून द्यावे अनुदान
सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेता, सरकारकडून अद्यापही अनुदानासाठी पत्र आलेले नाही. अशात पेरण्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे डीपीसीतून अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी जि.प. सदस्य व कृषी समितीचे सदस्य मनोज तितरमारे यांनी केली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांना अनुदानाची गरज
विदर्भात कॅश क्रॉप म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे. गेल्यावर्षी कापसावर आलेल्या रोगामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्