कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:25+5:302020-12-09T04:07:25+5:30
नागपूर : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नागपूर जिल्ह्यातील १३ ...
नागपूर : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नागपूर जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या स्थळी बाजारपेठा बंद राहिल्या. दुपारनंतर येथील व्यवहार पूर्ववत झाले. शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. तालुकास्तरावर तहसीलदार, पोलीस अधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन देत, नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कामठी, सावनेरसह प्रमुख बाजार समित्यांचे व्यवहार दुपारपर्यंत ठप्प राहिले.
कोराडी टी-पॉईंट
कोराडी : नवीन कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महादुला टी-पॉईंट येथे महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, सेवादलाचे वसंतराव गाडगे, वासुदेव बेलेकर, लीलाधर भोयर, संजय रामटेके, गंगाधर ढेंगरे, अजय बागडे, लीलाधर महाजन, अविनाश भोयर यांच्यासह महादुला व कोराडी ग्रामीणमधील काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बोखारा येथे महाविकास आघाडीच्या वतीने मार्च काढण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कुंदा राऊत, जि.प. सदस्य ज्योती राऊत, प्रीती अखंदे, अर्चना काकडे, धनश्री धोमने, दीपक राऊत, अनिता पंडित, बाबा पंडित, प्रकाश नकाले आदी उपस्थित होते.