शेतकरी आत्महत्या हा सरकारी बळी!

By admin | Published: July 23, 2016 03:13 AM2016-07-23T03:13:29+5:302016-07-23T03:13:29+5:30

शेतकऱ्याबाबत पूर्वीचे सरकार क्रूर होते आणि सध्याचे सरकार बावळट आहे, अशा प्रखर शब्दात सरकारचा समाचार घेतला.

Farmers' suicide is a government victim! | शेतकरी आत्महत्या हा सरकारी बळी!

शेतकरी आत्महत्या हा सरकारी बळी!

Next

‘जनमंच’ चा जनसंवाद : शेतकरी नेते अमर हबीब यांचे प्रतिपादन
नागपूर : शेतकऱ्याबाबत पूर्वीचे सरकार क्रूर होते आणि सध्याचे सरकार बावळट आहे, अशा प्रखर शब्दात सरकारचा समाचार घेतला. एखाद्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली की, त्याने आत्महत्या केली, असा आवर्जून शब्दप्रयोग केला जातो. मात्र वास्तवात ती शेतकऱ्याची आत्महत्या नसून तो सरकारी बळी असतो. मात्र तसा कुठेच शब्दप्रयोग केला जात नाही, अशी खंत शेतकरी संघटनेचे नेते तथा कृतिशील विचारवंत अमर हबीब यांनी व्यक्त केली.
‘जनमंच’ तर्फे जनसंवाद या कार्यक्रमातर्गंत ‘शेतकरी या देशाचे नागरिक नाहीत का?’ या विषयावर शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी होते.
विशेष अतिथी म्हणून शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, ‘जनमंच’ चे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर, सल्लागार प्रा. शरद पाटील, सचिव राजीव जगताप, प्रमोद पांडे व सुहास खांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामान्य माणसाच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अमर हबीब यांनी ‘शेतकरी’ या शब्दाची व्याख्या सांगताना ज्याची उपजीविका ही शेतीवर आहे, तोच खरा शेतकरी असे ते म्हणाले. मात्र अलीकडे या शब्दात गफलत केली जात असून, व्यापारी आणि नोकरदार सुद्धा सातबारा दाखवून स्वत:ला शेतकरी म्हणून घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय सरकारने सिलिंग कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले आहे. तसेच ग्रामीण भागातील तरुण हा शहराकडे स्थलांतरीत होऊ नये, त्याने शेतीतच राबावे, आणि शहरी लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करावी, असे षड्यंत्र रचले जात आहे. याशिवाय देशातील अत्यावश्यक वस्तूंचा कायदा हा शेतकऱ्यासाठी गळफास ठरला आहे. यामूळे या जाचक कायद्यातून शेतकऱ्यांची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत आत्महत्या वाढतच जाणार अशी त्यांनी भीती व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांसह येत्या २ आॅक्टोबरपासून राज्यात किसानपुत्र आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी हबीब यांनी सांगितले.
ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांसाठी कापसापासून ते कापडापर्यंत असलेली योजना ही आज कापसापासून तर त्याच्या कफनापर्यंत पोहोचली असल्याचे म्हणाले. या देशात शेतकऱ्यांचे राजकारण खेळले जात आहे. मात्र त्याचवेळी ‘जनमंच’ ही चळवळ नसून, शेतकऱ्यांच्या मनातील तळमळ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन अजेय गंपावार यांनी केले. ‘जनमंच’ चे सचिव राजीव जगताप यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

सामान्य माणसाला अभिवादन
या कार्यक्रमात व्यासपीठाच्या बाजूला ठेवून असलेला एक अर्ध पुतळा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. एरवी देवी-देवता किंवा महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. परंतु या कार्यक्रमाचा प्रारंभ या अर्ध पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला. या अर्ध पुतळ्यात कष्टकरी व शेतमजुराचे प्रतिबिंब आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनात असलेल्या या सामान्य माणसाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून यानंतर जनमंच आपल्या सर्व कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याचे यावेळी ‘जनमंच’ चे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी जाहीर केले. हा अर्ध पुतळा प्रख्यात तरुण शिल्पकार किशोर पवार यांनी साकारला आहे.

शेतकरी वाचला तर देश वाचेल!
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित गजानन अमदाबादकर यांनी यावेळी जगातील सर्वांत सुपीक जमीन असलेला विदर्भ आज स्मशानभूमी बनला असल्याचे दु:ख व्यक्त करीत, शेतकरी वाचला तर हा देश वाचेल, असे सांगितले. मात्र आज समाजात शेतकऱ्याच्या मरणाची सुद्धा टिंगल केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी केवळ सरकारच आरोपी नाही, तर समाजही तेवढाच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

सेवानिवृत्त भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी दिली पेन्शन
या कार्यक्रमात शासकीय तंत्र माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक सुनील जनार्दन भुसे यांनी ‘जनमंच’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. विशेष म्हणजे, भुसे नुकतेच ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले असून, ही २५ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या पहिल्या पेन्शनची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांची ही मदत नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 

Web Title: Farmers' suicide is a government victim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.