गोवंश हत्याबंदीने थांबतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: May 17, 2015 03:00 AM2015-05-17T03:00:16+5:302015-05-17T03:00:16+5:30
राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे.
नागपूर : राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे.
जैन संत आचार्य श्री गिरनारसागर महाराज यांच्या सानिध्यात आणि गोवंश उपयोगिकीकरण संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुमत लल्ला जैन यांनी सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायदा नागरिकांच्या हिताचा आहे. याबाबत कायदा तयार झाल्यानंतर काही दिवसाने काही राजकीय नेते आणि संघटना याचा विरोध करीत आहेत.
राजकीय नेते केवळ राजकीय फायद्यासाठी वक्तव्य करून आंदोलनाचा इशारा देत आहेत. गोवंशाच्या सातत्याने होत असलेल्या हत्येमुळे हा पशु अतिशय वेगाने नष्ट होत आहे. गोवंशाची हत्या हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील एक कारण आहे. गावात गाईचे दूध आणि दूधाच्या उत्पादनांची खूप कमतरता आहे. गोवंश वाढल्यामुळे काही वर्षापूर्वी चर्म उद्योग चांगला सुरू होता. कारण गावात नैसर्गिकरीत्या मृत्यू होणाऱ्या गार्इंचे चामडे चर्मकारी काढत होते. यामुळे चर्मकारांना रोजगार मिळुन चर्मोद्योग चांगला सुरू होता.
परंतु कत्तलखान्याच्या मोठ्या मागणीमुळे गोवंश वेगाने नष्ट केल्या जाऊ लागला. भाकड होण्यापूर्वीच गार्इंची हत्या होऊ लागली. गोवंशाचा मृत्यू गावात न झाल्यामुळे गिधाडांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली.
त्यामुळे जनतेने या कायद्याबाबत भ्रमात न पडता या कायद्याचा आदर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत संस्थेचे कोषाध्यक्ष सुुरेश आग्रेकर, रवीन्द्र आग्रेकर, जैन सेवा मंडळाचे मंत्री सतीश पेंढारी, हिराचंद मिश्रिकोटकर, विजय सोईतकर, गिरीश हनुमंते उपस्थित होते.(प्रतिनिधी)