शेतकऱ्यांप्रमाणे वाहतूकदारही करणार देशात ‘चक्का जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:57+5:302021-02-07T04:07:57+5:30
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या निरंतर वाढत्या किमतीमुळे वाहतूक व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, आता वाहतूकदारही शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर ...
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या निरंतर वाढत्या किमतीमुळे वाहतूक व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, आता वाहतूकदारही शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर देशभर चक्का जाम आंदोलन करणार आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तात्काळ कमी कराव्यात, अशी विविध वाहतूकदार संघटनांची मागणी आहे. इंधनाच्या किमतीत चर्चा करण्यासाठी शनिवारी गांधीबाग येथे झालेल्या वाहतूकदारांच्या बैठकीत ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी उपरोक्त निर्णयाची माहिती दिली. मारवाह म्हणाले, पूर्वी नोटाबंदी आणि नंतर जीएसटीमुळे वाहतूक व्यवसायात मंदीचे वातावरण आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक व्यवसाय संकटात आला आहे. देशातील अनेक उद्योग बंद झाल्याने माल वाहतुकीत घसरण झाली आहे. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना पेट्रोल आणि इंधनाच्या किमतीत वाढ करण्याची सूट दिली आहे. यामुळे केरोसिनचा काळाबाजार वाढला आहे.
आकड्यांचा हवाला देताना ते म्हणाले, दहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १३५ ते १४० रुपयांवर पोहोचले होते तेव्हा पेट्रोल ४५ रुपये आणि डिझेल ३५ रुपये लिटर होते. आता कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६० रुपयावर आहेत. त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून पेट्रोलचे दर शंभरीकडे जात आहेत. त्यातुलनेत ट्रकभाडे कमी झाले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च काढणे कठीण झाले आहे. वाहतूकदार ट्रकचे हप्ते, टायरचे वाढते दर, टॅक्स आणि इन्शुरन्सच्या बोझ्याखाली दबले आहेत. अशास्थितीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या टप्प्यात आणावे. त्यामुळे भाव कमी होऊन सर्वसामान्य आणि वाहतूकदारांना दिलासा मिळेल. असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर वाहतूकदार देशभर चक्का जाम आंदोलन करेल, असे मारवाह यांनी स्पष्ट केले.