बोंडअळीमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:08 AM2018-10-27T11:08:15+5:302018-10-27T11:10:39+5:30
यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले.
नितीन नागपुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले. यावर्षी सांगितल्याप्रमाणे व वेळोवेळी पाऊस न आल्याने बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सोयाबीनचे उभे पीक नांगरावे लागले. या सर्व संकटाना समोर जात असताना आणखीन एक संकट बळीराजासमोर उभे ठाकले आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे कृषी विभागामार्फत बोंडअळी आल्याबाबतची पाहणी करण्यात आली.
यावेळी कृषी विभागाकडून अमित वानखडे कृषी सहायक यांनी नरखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन बोंडअळीची पाहणी केली. तर त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले की बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावेळी त्यांनी उपाययोजना म्हणून फवारणी ही योग्य पद्धतीने व वेळेवर झाल्यास यावर नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.
जलालखेडा येथील सुरेश बारापात्रे यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता असे आढळून आले की जवळपास सर्वच आठ एकर शेतातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिवाळीअगोदर मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
आठ एकर शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्यामुळे कपाशीला पाणी देऊन त्याला जगवले. वेळोवेळी फवारणीसुद्धा केली आता कपाशीला जवळपास ६० ते ७० बोंड आहेत. परंतु सर्वच बोंडामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे मोठे संकट समोर उभे ठाकले आहे.
सुरेश बारापात्रे, शेतकरी जलालखेडा
मागील वर्षीसुद्धा आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या वर्षी याची पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून कमीत कमी तीन दिवसात स्पिनोस्यड ४५ ची फवारणी करावी.
अमित वानखडे, कृषी सहायक, भारसिंगी