‘गाढव’ गेले रिकामे, ‘मेंढा’कडून अपेक्षा; आता भिस्त आर्द्रावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 08:14 PM2022-06-28T20:14:14+5:302022-06-28T22:04:04+5:30

Nagpur News पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे.

Farmers waiting for rain | ‘गाढव’ गेले रिकामे, ‘मेंढा’कडून अपेक्षा; आता भिस्त आर्द्रावर !

‘गाढव’ गेले रिकामे, ‘मेंढा’कडून अपेक्षा; आता भिस्त आर्द्रावर !

Next

नागपूर : दरवर्षीसारख्याच यंदाही मृगाने वाकुल्या दाखिवल्या आहेत. पावसाचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या १० टक्के पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मृग कोरडा गेला, निदान आर्द्रा तरी बरसतील, अशी शेतकऱ्यांची आशा असल्याने आताही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून काहींनी पेरणीची तयारी केली आहे. असे असले तरी नक्षत्रांचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी १०२.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या तुलनेत मागील वर्षी मात्र १८९.८ मि.मी. पाऊस पडलेला होता. हा फरक लक्षात घेता यंदा आजवरच्या पावसाची टक्केवारी कमी आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे.

सर्वाधिक १५६.१ मि.मी. पाऊस नरखेडमध्ये

जिलह्यात सर्वाधिक पाऊस नरखेडमध्ये पडला असून १५६.१ मि.मी. पावसाची नोंद या तालुक्यात आहे. गतवर्षी जूनअखेर १७७.९ मि.मी. पाऊस या तालुक्यात पडला होता. यंदाही येथे पाऊस सरासरीच्या जवळपास पोहोचला असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

सर्वांत कमी ४९.२ मि.मी. पाऊस मौदामध्ये

यंदा आतापर्यंत सर्वांत कमी पाऊस मौदा तालुक्यात पडला असून त्याची नोंद ४९.२ मि.मी. घेण्यात आली आहे. मागील वर्षी या तालुक्यात जूनअखेरपर्यंत १६५ मि.मी. पाऊस पडलेला होता. यंदा हे प्रमाण बरेच कमी आहे.

गतवर्षी आतापर्यंत १८६.८ मि.मी. पाऊस

मागील वर्षी आतापर्यंत १८६.८ मिमी पाऊस पडला होता. यंदा त्यात घट असून ८७ मि.मी.ने सरासरी पावसात घट आहे. याचा परिणाम पेरणीवर झालेला दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत.

पेरणीसाठी थोडे थांबा

कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मते पेरणीचे दिवस अद्याप संपायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करण्याची गरज नाही. १५ जुलैपर्यंत पेरणीसाठी कालावधी आपल्या हातात आहे. सोयाबीनसारख्या पिकासाठी पेरणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी केल्यास पीक वाया जाणार नाही.

ओलिताचे साधन असल्यास पेरणीसाठी त्वरा केल्यास हरकत नाही. मात्र, अन्य शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करावी. कृषी विद्यापीठानेही १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...

Web Title: Farmers waiting for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती