शेतकऱ्यांना हवे अनुदानावर सौर ऊर्जा कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:47+5:302021-06-29T04:07:47+5:30
नागपूर : शेतशिवारातील वन्यप्राण्यांकडून होत असलेले शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण ही योजना राबविण्याची मागणी ...
नागपूर : शेतशिवारातील वन्यप्राण्यांकडून होत असलेले शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण ही योजना राबविण्याची मागणी यापूर्वी अनेकदा वन विभागाकडे झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडेही ही मागणी नोंदविली आहे. मात्र यावर अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना यंदाही स्वत:हूनच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. लगतच शेतीही आहे. वाघ-बिबटसह इतरही वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. जंगलव्याप्त गावातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर अधिक असल्याने असल्याने हाती आलेले पीक वन्यप्राण्यांकडून नष्ट होत असते. उगवलेले पीक तसेच पेरलेले बियाणे रानडुकरांकडून उकरून खाल्ले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
...
ताडोबाच्या बफर झोनचा कित्ता गिरवावा
मागील पाच वर्षापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या गावात वनविभागाकडून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण अनुदान तत्त्वावर देण्यात आले आहे. यामुळे रानडुक्कर, चितळ, सांबर यासारख्या वन्यप्राण्यांकडून होत असलेले पिकाचे नुकसान टाळण्यात यश आले आहे. ही योजना फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात आहे. यातील यश लक्षात घेऊन सौर ऊर्जेचे कुंपण शेतकऱ्यास अनुदान तत्त्वावर देण्याची योजना ‘मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण’ ही योजना राबविता येऊ शकते. इको-प्रोचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी तत्कालीन वनमंत्र्यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती.
...
खर्च फक्त १३ हजार
सौर ऊर्जा कुंपणाचा खर्च फक्त १३ हजार रुपयांचा आहे. शेताभोवती सौर कुंपण लावण्यात येते. यात सोलर पॅनल, बॅटरी, तार याचा समावेश असतो. पीक नसेल तेव्हा सदर कुंपण काढून ठेवता येते. येणाऱ्या खर्चापैकी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१५ ते २०१९ या काळात आतापर्यंत येथे १,४६५ सौर ऊर्जा कुंपण वितरित केले आहेत.
...
असे आहेत फायदे
- शेतकऱ्यास जागली जाण्याची गरज नसते.
- वीज प्रवाह सोडून होणाऱ्या शिकारी टाळता येतील.
- मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येतो.
- रबी व अन्य पीक घेणे सहज शक्य होते.
- उत्पन्नवाढीला सहाय्यभूत आहे.
...