शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणणार
By admin | Published: December 28, 2014 12:39 AM2014-12-28T00:39:37+5:302014-12-28T00:39:37+5:30
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल,
देवेंद्र फडणवीस : बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन
वाडी : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बँक आॅफ महाराष्ट्रच्या वाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्मराम होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. समीर मेघे, रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय निदेशक जे. एम. जीवानी, क्षेत्र महाव्यवस्थापक पी. बी. अंभोरे, टी. व्ही. रमण मूर्ती उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, वाडी भागात व्यापार व उद्योग प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या भागात बँक आॅफ महाराष्ट्रने शाखा सुरू करून ही कमी दूर केली आहे. ग्रामीण भागात बँकांचे जाळे विणल्यास शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांकडे जावे लागणार नाही. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने ग्रामीण भागात शाखा सुरू करण्यासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. सध्या पुणे, ठाणे व मुंबई परिसरात बँकांमध्ये ६० टक्के गुंतवणूक होते. ती आता राज्याच्या इतर भागात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या भागात बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात आहेत, त्या भागात शेतकरी आत्महत्या करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर. आत्मराम यांनी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पी. बी. अंभोरे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही खातेदारांना एटीएम कार्ड व पासबुकचे वितरण करण्यात आले. टी. व्ही. रमण मूर्ती यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)