पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

By गणेश हुड | Published: July 29, 2023 04:43 PM2023-07-29T16:43:44+5:302023-07-29T16:45:09+5:30

विमा काढलेल्या पिकाचाही सर्वे नाही : शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच

Farmers without crop insurance will not get compensation; There is no survey of insured crops either | पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

googlenewsNext

नागपूर : मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने अद्याप दिलेली नाही. त्यात यंदा २६ व २७ जुलैला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. २ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आडवी झाली आहेत. तर कुठे जमीन खरडून गेली आहे. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही. अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. दुसरीकडे विमा काढलेला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा कंपन्यांनी अद्याप सर्वे केलेला नाही. त्यात शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्याच्या उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील २५९० शेतकऱ्यांच्या २ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे कापूस, सोयाबिन आणि तूर या पिकाचे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात २६ आणि २७ जुलै रोजी धुव्वाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर २६ जुलै रोजी झालेल्या पावसात उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील खरिपाच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही. अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

विमा कंपन्यांनी विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता अतिवृष्टीग्रस्त गावांतील परिस्थिती गंभीर आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी केली आहे.

अध्यक्ष,उपाध्यक्षांनी केली १८ गावांची पाहणी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. हिंगणा तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पेंढरी (देवळी), किरमिटी (भारकस), खडकी, सुकळी (बेलदार), बिडगणेशपुर, टाकळघाट तर नागपूर ग्रामीण मधील बैलवाडा , पांजरी (लोधी), सुकळी, मांगरूळ (तुंबडी), वाकेश्वर, वारंगा, कोलार, परसोडी, देवडी (गुजर) किन्हाळमाकडी, रुईखैरी, खापरी (सुभेदार) गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच पावसामुळे पडझड झालेल्या घरांची माहिती घेतली.

Web Title: Farmers without crop insurance will not get compensation; There is no survey of insured crops either

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.