शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:20 PM2018-08-03T23:20:51+5:302018-08-03T23:23:00+5:30
पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात कन्हान नजीकच्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी परिसरात शुक्रवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पावसाने दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक सुकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, याच पिकावर शेतकऱ्यांची खरी भिस्त आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात ओलितासाठी सोडत नसल्याने तसेच प्रशासन पर्यायी व्यवस्था करायला तयार नसल्याने या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता नागपूर-जबलपूर महामार्गावरील डुमरी शिवारातील अण्णा मोड येथे शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्या बॅनरखाली ‘रास्ता रोको’ करायला सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केले.
हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. यावेळी राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.
१२ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल
या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्या १२ आंदोलकांविरुद्ध कन्हान पोलिसांनी भादंवि ३४१, १४३, १४९, मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यात जीवन मंगळे, रमेश कारेमोरे, घनश्याम निंबोने, सूर्यभान टोंतफु, प्रकाश सुखदेव, श्रीनिवास सुब्बाराव, भाऊराव कोकाटे, मुकेश यादव, सूरजलाल जमकुरे, अमोज वानखेडे, श्रीकांत बावनकुळे, सायबा बरबटे यांचा समावेश आहे.