उपवास करा, पण आरोग्यही जपा; पचतील असेच पदार्थ घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 08:38 PM2022-08-09T20:38:53+5:302022-08-09T20:39:16+5:30
Nagpur News उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
नागपूर : महादेवाचा मास म्हणून श्रावण महिना मानला जातो आणि म्हणूनच श्रावणात उपवास करणे हा श्रद्धेचा भाग ठरतो. तसे उपवास करणे चांगलेच आहे. परंतु, ज्याला शक्य असेल आणि ज्याच्या शरीराला परवडेल अशांनीच उपवास करणे महत्त्वाचे असते. या महिन्यात उपवास करताना अनेकदा आपल्या पोटावर अपाय होतात. उपवास करताना पोट बिघडू नये म्हणून उपवासाच्या काळात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पोटाला त्रास होणार नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
उपवासाला काय खाल?
उपवासाला साधारणतः आपण हलके पदार्थ खाऊ शकतो जसे राजगिरा शिरा, शिंगाडा, वरीचे तांदूळ यासारखे हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता. राजगिऱ्यात कॅल्शियम, लोह यासारखे पदार्थ चांगले असतात. १०० ग्रॅम शिंगाडामध्ये ‘क’ जीवनसत्व असतात. याऐवजी शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. वरीचे तांदळात जीवनसत्वे खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.
१२ तास अंतर ठेवा
उपवासाला फराळ करताना आपण काय खात आहोत आणि ते किती प्रमाणात खात आहोत. यावर आपले पोटाचे तंत्र बसलेले असते जर या उपवासात तुम्ही साबुदाणा, भगर यासारखे पदार्थ खात असाल तर हे खाताना किमान १२ तासांचा अवधी ठेवा जेणे करुन हे पदार्थ पचनास सोपे जातील.
काय खाऊ नये?
उपवासाच्या दिवसात आपण साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ यासारखे पदार्थ होईस्तोवर टाळावे कारण या पदार्थांमध्ये तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच कोणतीही जीवनसत्वे यामध्ये नसतात. तसेच मोठ्या प्रमाणात आम्लपित्त असतात. ज्यामुळे हे पदार्थ पचायला जड जातात.
साबुदाणा न खाल्लेलाच बरा
साबुदाण्यात फक्त पिष्टमय पदार्थ असतात. तसेच साबुदाणा पचायला जड असतो. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. याच्या अति सेवनाने शरीराचे वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.
आहार तज्ज्ञ म्हणतात....
उपवासामुळे तब्येतीवर परिणाम होणार नाही. ज्यांना पित्त आहे त्यांनी साबुदाणा खिचडीसारखे पदार्थ खाऊ नये. ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे अशांनी शक्यतो उपवास करूच नये आणि उपवास करायचे असल्यास कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी फळे खावी जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर परिणाम होणार नाही.
- डॉ. हरिभाऊ मस्के, आयुर्वेदिक तज्ज्ञ