दिवसा चटके, रात्री कडाका! कडाक्याच्या थंडीसाठी आणखी चार दिवस प्रतीक्षाच
By निशांत वानखेडे | Published: November 11, 2023 06:14 PM2023-11-11T18:14:39+5:302023-11-11T18:15:46+5:30
काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस राहणार
नागपूर : दोन दिवस आकाशात दाटलेले ढग शनिवारी बऱ्यापैकी निवळले आणि आकाश निरभ्र झाले. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिक जाणवला. दिवस आणि रात्रीचा पारा सरासरीच्या वर असून, हवी तशी थंडी अद्याप पडलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, कडाक्याच्या थंडीसाठी आणखी चार-पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.
शनिवारी नागपुरात दिवसाचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले, जे सरासरीच्या १.१ अंश अधिक आहे. दुसरीकडे रात्रीचा पारासुद्धा सरासरीच्या ०.९ अंश अधिक असून, १७.८ अंशावर गेला आहे. विदर्भात चंद्रपूर ३१.४ अंश वगळता सर्वच शहरात कमाल तापमान ३३ अंशाच्या वर आहे. अकोल्यात सर्वाधिक ३५.४ अंशावर पारा गेला आहे. त्यामुळे चटके वाढले असून, उष्णता जाणवते आहे. चंद्रपूर वगळता रात्रीचा पारासुद्धा सर्व शहरात सरासरीच्या १ अंश वरच आहे. त्यामुळे अद्यापतरी थंडीचा प्रभाव अधिक नाही.
ढगांची गर्दी हटल्याने आता वातावरण अधिक स्वच्छ होऊन पहाटेचा गारवा वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र थंडीचा जोर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस राहणार आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. अंदाजानुसार १६ नाेव्हेंबरला दिवस-रात्रीच्या तापमानात घसरण हाेऊन १७ नाेव्हेंबरपासून थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे.