नागपुरात अन्नदात्यासाठी अन्नत्याग : किसानपुत्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:50 PM2018-03-12T22:50:25+5:302018-03-12T22:50:49+5:30
किसानपुत्र आंदोलनाअंतर्गत यावर्षी पुन्हा एकदा जनमंचच्यावतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक दिवसाच्या उपोषणाचे लाक्षणिक आंदोलन येत्या १९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किसानपुत्र आंदोलनाअंतर्गत यावर्षी पुन्हा एकदा जनमंचच्यावतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे एक दिवसाच्या उपोषणाचे लाक्षणिक आंदोलन येत्या १९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले आहे.
नागपुरात जनमंच हे नागरिकांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना जनमंचचा मोठा आधार वाटतो. किसानपुत्र आंदोलकांचीही संस्था पालक आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात किसानपुत्र आंदोलनाचे दुसरे राज्यस्तरीय शिबिर जनमंचने घेतले होते. तसेच गेल्यावर्षी सुद्धा १९ मार्चच्या उपोषणासाठी पुढाकार घेतला होता. यावर्षीही जनमंचने उपोषणाचे आवाहन केले असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी कळविले आहे.
अन्नत्याग आंदोलन हे, साहेबराव करपे यांच्यासह आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी, शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी, ज्या धोरणांनी शेतकऱ्यांना मरण पत्करावे लागते, त्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडण्याता संकल्प करण्यासाठी आयोजित केले जाते. आपण धार्मिक उपवास खूप केले आता एक उपवास अन्नदात्यासाठी करूया. सार्वजनिक स्वरुपात उपोषण करता येत असेल तर जरूर करा. पण ते शक्य नसेल तर वैयक्तिकरीत्या उपवास करा, असे आवाहनही अमर हबीब यांनी केले आहे. यासोबतच जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनीसुद्धा अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग करून त्याला मानसिक व सामाजिक पाठबळ द्या. मी या आंदोलनात सहभागी होणार, आपणही यात सहभागी व्हा आणि बळीराजाला बळ द्या, असे आवाहन केले आहे.