पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:36 AM2019-02-16T00:36:41+5:302019-02-16T00:37:25+5:30
पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी १० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोहचतील.येथून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने ते पांढरकवड्याला जातील आणि नंतर १ वाजता परत येतील. नागपुरात त्यांचा कोणता कार्यक्रम नाही केवळ १० ते १५ मिनिटे ते विमानतळावर थांबतील मात्र या वेळेत कसलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणांनी पुरती खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाच्या सभोवतालचा परिसर सील करण्यात आला आहे. १००० पेक्षा जास्त सशस्त्र जवान या भागात तैनात करण्यात आले आहे. शिवाय शहरातही चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व संवेदनशील स्थळे आणि महत्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.