फास्टॅग संपले, वाहन चालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:30 AM2019-12-04T10:30:48+5:302019-12-04T10:33:17+5:30
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ उपक्रमाची शेवटची तारीख १ डिसेंबर होती, परंतु त्यापूर्वीच काही खासगी बँका व टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ संपले.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर ‘फास्टॅग’ उपक्रमाची शेवटची तारीख १ डिसेंबर होती, परंतु त्यापूर्वीच काही खासगी बँका व टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ संपले. आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचदरम्यान टोल नाक्यांवर कार्डसाठी शुल्क घेतले जाणार नसल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे हा उपक्रम लागू करण्यापूर्वी काय निर्णय घेण्यात आले होते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात ‘फास्टॅग’बाबत विशेष जनजागृती झाली नाही. आजही अनेक ठिकाणी ते उपलब्ध नाही. यामुळे बहुसंख्य वाहनचालक व मालकांमध्ये असामंजस्याचे वातावरण आहे. स्वत: बँॅकेचे कर्मचारी ‘फास्टॅग’ कुठे मिळतात, हा प्रश्न विचारत आहेत. टोलनाक्यावर काही खासगी बँकेचे कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला ‘फास्टॅग’ तयार करण्यासाठी १०० रुपये शुल्क घ्यायचे. आता हे शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे ज्यांनी शुल्क घेऊन ‘फास्टॅग’ घेतले त्यांना आपण लुबाडले गेल्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी कार्डमध्ये डिपॉजिट ३०० रुपये व किमान शिल्लक २०० रुपये असणे आवश्यक होते. परंतु आता सांगण्यात येत आहे की, वाहनधारकांना ४०० रुपये आणि त्याहून कितीही आगाऊ रक्कम कार्डमध्ये भरता येणार आहे. ‘फास्टॅग’ प्रणालीत ‘फास्ट’ शब्द लिहिला आहे. परंतु टोल नाक्यांवर ‘टॅग’ लागलेल्या वाहनांनाही अडविले जात आहे.
‘फास्टॅग’चा पुरवठा कमी
‘फास्टॅग’ लावूनही पूर्वी प्रमाणेच येण्या-जाण्याची मुदत २४ तासांची असणार आहे. सर्व्हरवर संबंधित टॅगचा नंबर ‘एन्रोल’ होतो. सध्या ‘फास्टॅग’चा पुरवठा कमी आहे, परंतु लवकरच तो सुरळीत होईल.
-नरेश वडेट्टवार,
महाव्यवस्थापक, एनएचएआय
अचानक वाढली मागणी
‘फास्टॅग कार्ड नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया’ (एनएचआय) ‘आयएचएमसीएल सेल’ तयार करीत आहे. सुत्रानूसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अचानक ‘फास्टॅग’ची मागणी वाढली. यामुळे तुटवडा निर्माण झाला. आता, तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखी स्थिती झाली आहे. देशात कोट्यवधी वाहने आहेत. उशिरा जनजागृती करण्यात आल्याने व अंमलबजावणी खूप लवकर करण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. सांगण्यात येते की, केवळ दोन खासगी बँकांच्या माध्यमातून टोल नाक्यांवर फास्टॅग उपलब्ध करुन दिले होते. याशिवाय, ते कुठे उपलब्ध आहेत याची माहितीही अनेकांना नव्हती.
राज्याचा टोलवरही प्रश्न
पीडब्ल्यूडी नागपूरच्या अंतर्गत आरंभा टोल व चंद्रपूर रोडवर विसापूर टोल नाक्यांवर आतापर्यंत ‘फास्टॅग’ची अद्यापही सोय नाही. सुत्रानुसार, काही दिवसांपूर्वी या नाक्यांना ‘फास्टॅग’ची सोय करून देण्याचे निर्देश दिले. सांगण्यात येते की ‘एनएचआय’चे ‘आयएचएमसीएल’ राज्याच्या टोल नाक्यांची मदत करण्यास तयार आहे. परंतु नागपूर स्तरावर हे सांगितलेच जात नाही आहे की, राज्यात किती टोल नाक्यांना नवी प्रणालीशी जोडण्यासाठी कोणत्या समस्या येत आहेत आणि एकूण किती राज्यातील टोल नाके फास्टॅग झाले आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी केवळ एवढेच सांगितले की, फास्टॅग टोलला घेऊन निर्देश देण्यात आले आहेत.