नागपुरात भीषण अपघात; पुलावरुन खाली पडून चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये २ चिमुकल्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 11:00 AM2022-09-10T11:00:21+5:302022-09-10T11:26:04+5:30
सक्करदरा उड्डाणपुलावर अनियंत्रित कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली.
नागपूर : नागपूरमधील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला आहे. पुलावरून जाणाऱ्या एका कारने पुढील दोन दुचाकींना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवर असलेले चौघेजण पुलाखाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ चिमुकल्या मुलांचा समावेश आहे.
माहितीनुसार, हा अपघात काल (दि. ९) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. सक्करदरा परिसरात रात्री उशिरा पुलावरून जाताना अनियंत्रित कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की एका दुचाकीवरील चौघे जण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून उड्डाणपुलावरुन खाली रस्त्यावर फेकले गेले व त्यांचा मृत्यू झाला. विनोद पूनाजी खापेकर (४५), लक्ष्मी पुनाजी खापेकर (६५), वेदांत विनोद खापेकर (११) आणि विवान विनोद खापेकर (५) सर्व रा. टिमकी अशी मृतांची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री महिंद्रा एसयुवी एम एच ४९, एएस चा चालक गणेश अरुण कडबे (३३, बुट्टीबोरी) याने दारूच्या नशेत खापेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील खापेकर कुटुंबीय उड्डाणपुलाच्या खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. कारचालकाने उड्डाण पुलावरील इतर तीन दुचाकींनाही धडक दिली यात मो. दानिश मो. मुनीर अंसारी (२०, राऊत नगर दिघोरी), मो. इलियास बरकत उल्ला अंसारी, कमरून निसार इलियास अंसारी (२०, अन्सार नगर मोमिनपुरा) आणि अयान इरफान अंसारी (४) हे जखमी झाले.
घटेनची माहिती समजताच सक्करदार पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचारीसोबतच कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील कार सक्करदरा येथील डेकोरेशन व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. पुढील तपास सकरदरा पोलीस करीत आहेत.