नागपूर जिल्ह्यात दहेगावनजीक भीषण अपघात ; २ ठार, ७ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 07:52 PM2019-01-04T19:52:05+5:302019-01-04T19:53:03+5:30
‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) (ता. सावनेर) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा) : ‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) (ता. सावनेर) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ६.५५ वाजताच्या सुमारास घडली.
मोहम्मद रफिक मोहम्मद शफिक अन्सारी (१८) व शेख नूर मोहम्मद शेख रहीम (१८) दोघेही रा. यशोधरानगर, नागपूर अशी मृत तरुणांची नावे असून, जखमींमध्ये इरफान हबीबउल्लाह अन्सारी (१५), मोहम्मद रईस मोहम्मद सईद अन्सारी (२०), रियाजउद्दीन अन्सारी सलाहउद्दीन अन्सारी (१६), शमीम अख्तर शफिक अहमद (१८), गयासउद्दीन अन्सारी सलाहउद्दीन अन्सारी (१८), शेख असिफ शेख अजीज (२४) व बाबू ऊर्फ शोहेब अन्सारी (१७) सर्व रा. यशोधरानगर, नागपूर यांचा समावेश आहे.
हे सर्व जण वाकी (ता. सावनेर) येथील कव्वालीचा कार्यक्रम आटोपून एमएच-१२/जीझेड-१३९३ क्रमांकाच्या तवेराने नागपूरला येत होते. त्यांचे वाहन दहेगाव (रंगारी) येथील ‘फ्लाय ओव्हर’वरून उतरत असतानाच वेकोलिच्या एमएच-४०/एटी-०४८८ क्रमांकाच्या स्टाफ बसने ‘सर्व्हिस रोड’वरून सावनेरकडे जाण्यासाठी ‘यू टर्न’ घेतला. बसने ‘यू टर्न’ घेताच तवेरा बसच्या मध्यभागावर आदळली. त्यात तवेरातील नऊ जण गंभीर जखमी झाले.
अपघात होताच परिसरातील फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मसराम, नितेश पिपरोदे व नीलेश बिजवाड यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सर्व जखमींना वाहनाबाहेर काढून स्वत:च्या वाहनाने लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. तिथे मोहम्मद रफिक मोहम्मद शफिक अन्सारी व शेख नूर मोहम्मद शेख रहीम या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
धोकादायक ठिकाण
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, ते ठिकाण धोकादायक आहे. कारण या ‘फ्लाय ओव्हर’लगत वस्तीशाळा, ग्रामपंचायत कार्यालय व बसस्टॉप आहे. याच परिसरात दहेगाव (रंगारी) येथील आठवडी बाजारही भरतो. त्यामुळे या परिसरात नागरिकांसोबत वाहनांची वर्दळ राहात असल्याने तसेच या मार्गावरील वाहने वगात येत असल्याने येथे वारंवार अपघात होतात.
उपाययोजनेकडे दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका विद्यार्थिनीचा तसेच वृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. येथे वारंवार अपघात होत असल्याने ते थांबविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने खापरखेडा पोलिसांना पत्र देत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजू कायम बंद करून गावातील वाहतूक ही ‘सर्व्हिस रोड’ने करावी. परिणामी, ‘यू टर्न’मुळे होणारे अपघात टळतील, असेही पत्रात नमूद केले होते. परंतु, वर्षभरापासून त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही.