फ्लॅटसाठी मावशीवरच केला जीवघेणा हल्ला, भाच्यासह तीघे गजाआड
By दयानंद पाईकराव | Published: August 18, 2024 05:23 PM2024-08-18T17:23:34+5:302024-08-18T17:23:54+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट १ ने आवळल्या आरोपींच्या मुसक्या.
नागपूर: लंडनमध्ये राहणाऱ्या मावशीने आपला फ्लॅट लहान बहिणीला दिला. हा फ्लॅट आपल्या मावशीने आपल्याला दिला नाही याची सतत खंत वाटत असल्यामुळे भाच्याने आपल्या मावशीला संपविण्याचा निर्णय घेऊन दोघांना तिच्या खुनाची सुपारी दिली. मावशीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनिय माहितीवरून आरोपी पुतण्या व त्याच्या दोन साथीदारांना गजाआड केले.
कुणाल शंभरकर (३३, रा. बुट्टीबोरी), साहिल कांबळे (१९, रा. धोबीनगर, नागपूर) आणि महिलेचा भाचा सिद्धांत गुल्हाटी (४६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. करीना खुराणा (५७) असे या घटनेत गंभीर झालेल्या महिलेचे नाव आहे.
१ ऑगस्ट २०२४ रोजी त्या आपल्या दुकानातून पायी घरी जात होत्या. रस्त्यात दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी करून ते पळून गेले. आरोपींनी आपल्या दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावली असल्यामुळे त्यांचा शोध घेणे तारेवरची कसरत होते. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (२, ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचीन भोंडे, योगेश वासनिक, स्वप्नील खोडके, मनोज टेकाम, नितीन वासनिक, विनोद देशमुख, हेमंत लोणारे, सुशांत सोळंकी यांनी आरोपी आलेल्या आणि परत गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. जखमी महिलेची मुले, सुना, नातेवाईकांना विचारपुस केली. परंतु कोणीच कोणावर संशय व्यक्त केला नाही.
अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेली गोपनिय माहिती यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींचे स्पष्ट चेहरे मिळवून आरोपी कुणाल, साहिल आणि टीप देणारा भाचा सिद्धांतला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कुठलाही सुगावा नसताना गुन्हे शाखेच्या युनिट १ ने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.