प्लॉटसाठी मोठा भाऊ अन् त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला

By दयानंद पाईकराव | Published: May 11, 2024 05:24 PM2024-05-11T17:24:50+5:302024-05-11T17:25:25+5:30

सख्ख्या बहिण-भावाचे कृत्य : चार वर्षांपासून सुरु होता प्लॉटसाठी वाद

Fatal attack on elder brother and his son for plot | प्लॉटसाठी मोठा भाऊ अन् त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला

Fatal attack on elder brother and his son for plot

नागपूर : प्लॉटवर अतिक्रमण करण्याच्या वादातून सख्ख्या बहिण आणि भावाने आपल्याच मोठ्या भावावर आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १० मे रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली.

प्रितमसिंह राजमणीसिंह राठोर (४२), मिथलेस राठोर (३४) दोघे रा. रामनगर, तेलंगखेडी, ममता चौव्हाण (४४) आणि तुलसीदास किसनसिंह चौव्हाण (४६, रा. बेलोना, नरखेड) अशी आरोपींची नावे आहेत. यातील प्रितमसिंह आणि तुलसीदासला पोलिसांनी अटक केली आहे. मंगलसिंह राजमणीसिंह राठोड (४७, रा. विनायक आश्रमजवळ, आकांशी ले आऊट) यांचा आकांशी ले आऊट दाभा येथे प्लॉट आहे. या प्लॉटवर ताबा मिळविण्यासाठी त्यांचा आपल्या भाऊ आणि बहिणीशी मागील चार वर्षांपासून वाद सुरु होता.

शुक्रवारी १० मे रोजी दुपारी २ वाजता त्यांचा भाऊ प्रितमसिंह, वहिणी मिथलेस, बहिण ममता चौहान आणि मेव्हने तुलसीदास हे गैरकायद्याची मंडळी जमवून प्लॉटवर अतिक्रमण करण्यासाठी आले. तेथे त्यांनी मंगलसिंह यांची पत्नी, मुलगा व मुलीसोबत वाद करून भांडण केले. यावेळी मंगलसिंह तेथे येऊन त्यांनी आपल्या बहिण व भावाला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी मंगलसिंह यांना शिविगाळ करून त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. मंगलसिंह यांचा मुलगा आलोकसिंह हा वडिलांना वाचविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्या डोक्यावरही रॉडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याच्यावर रविनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगलसिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान ठाण्याच्या उपनिरीक्षक सुप्रिया पुंडगे यांनी आरोपींविरुद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ४४७, ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून मंगलसिंह यांचा भाऊ प्रितमसिंह व मेव्हणे तुलसीदासला अटक केली आहे.

Web Title: Fatal attack on elder brother and his son for plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर