अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक
By दयानंद पाईकराव | Updated: April 15, 2023 15:07 IST2023-04-15T15:05:38+5:302023-04-15T15:07:54+5:30
तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक
नागपूर : मित्रासोबत दुचाकीवर बसून खरेदी करण्यासाठी जात असलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गालावर, चेहऱ्यावर मारून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना तहसील पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली असून तहसील पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
अब्दुल शाकिर उर्फ सलमान अब्दुल गफुर (३८, मोमिनपुरा, बशिर गॅरेजजवळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी १३ एप्रिलला रात्री १०.३० वाजता मोहम्मद नफिस अब्दुल गफुर अंसारी (४६, तकिया मासुमशहा मोमिनपुरा) यांचा मुलगा मोहम्मद फराज अनवर (१५) हा त्याच्या मित्रासह गाडीवर बसून खरेदी करण्यासाठी जात होता.
आरोपी अब्दुलने मोहम्मद फराज अनवर व त्याच्या मित्राला विनाकारण शिविगाळ केली. त्याने आरोपीला हटकले असता आरोपी अब्दुलने भांडण करून आपल्या जवळील वस्तऱ्यासारख्या शस्त्राने मुलाच्या डाव्या गालावर, चेहऱ्यावर मारून त्यास गंभीर जखमी केले. मोहम्मद फराजला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मोहम्मद नफिस यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.