सासूरवाडीवरून परतणाऱ्या युवकावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:21 AM2020-12-04T04:21:26+5:302020-12-04T04:21:26+5:30
नागपूर : सासूरवाडीवरून परत जात असलेल्या युवकावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री काटोल मार्गावर ...
नागपूर : सासूरवाडीवरून परत जात असलेल्या युवकावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री काटोल मार्गावर घडली. या घटनेमुळे गिट्टीखदान पोलीस चक्रावले आहेत.
राकेश डेकाटे (३३) रा. इतवारी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. राकेशची सासूरवाडी धापेवाडात आहे. सोमवारी राकेशच्या सासूरवाडीत कार्यक्रम होता. त्यात सहभागी होण्यासाठी तो पत्नी राजश्री आणि मुलगा वैष्णवसोबत सासूरवाडीला गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री ७.३० वाजता तो नागपूरला परत येत होता. काटोल मार्गावर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाजवळ वैष्णवने उलटी होत असल्याचे सांगितले. राजश्रीने राकेशला दुचाकी थांबविण्यास सांगितले. राकेश थांबल्यानंतर राजश्री वैष्णवला रस्त्याच्या कडेला उलटी करण्यासाठी घेऊन गेली. राकेश दुचाकीजवळ थांबला होता. तेवढ्यात तोंडाला दुपट्टा बांधलेला युवक तेथे आला. त्याने राकेशच्या डोक्यावर वार केला. राकेश जखमी झाल्यानंतर हल्ला करणारा युवक पळून जात होता. परंतु दोन-चार पावले टाकल्यानंतर तो पुन्हा परत आला. त्याने राकेशच्या पोटावर चाकूने वार केला. राकेशला गंभीर जखमी करून तो पळून गेला. हल्ला करणाऱ्या युवकाने काही अंतरावरच आपली दुचाकी उभी केली होती. आपल्या दुचाकीवर स्वार होऊन तो कळमेश्वरच्या दिशेने पळून गेला. राजश्रीने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मदत मागितली. राकेशला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. कोणत्याही प्रकारची लुटमार किंवा वाद न घालता हल्ला झाल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. घटनास्थळी किंवा काटोल मार्गावर सीसीटीव्ही नसल्यामुळे हल्लेखोर युवकाचा पत्ता लागू शकला नाही. पोलिसांनी राकेश आणि राजश्रीला विचारपुस केली. दोघांनी कुणाशीही वाद नसल्याची माहिती दिली. यात राकेशला नुकसान पोहोचविण्यासाठी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. डेकाटे दाम्पत्याचा धापेवाडापासूनच पाठलाग करण्यात येत होता. हल्लेखोर राकेश थांबण्याची वाट पाहत होता. गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...........