रामटेक तालुक्यात २१२ उमेदवरांचे भाग्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:30+5:302021-01-16T04:13:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. येथील ८२ जागांसाठी एकूण २१२ उमेदवार निवडणूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. येथील ८२ जागांसाठी एकूण २१२ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. त्या सर्वांचे सायंकाळी राजकीय भवितव्य मशीनबंद करण्यात आले. या गावांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४६.६६ टक्के, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता.
तालुक्यातील किरणापूर, खुमारी, पथरई, चिचाळा, देवलापार, पंचाळा (बु), शिवणी-भाेंडकी, दाहाेदा व मानापूर या ग्रामपंचायतींमधील एकूण ८२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या गावांमध्ये एकूण मतदारसंख्या १९,१३८ असून, यात ९,७४५ पुरुष व ९,३९३ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी थंडीमुळे सकाळी ९.३० वाजेपर्यंत १०.५२ टक्के मतदारांनी मतदान केले हाेते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला.
दरम्यान, सकाळी ११.३० वाजेपर्यंत २५ टक्के, तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४६.६६ टक्के व दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर दुपारनंतर महिला मतदारांची गर्दी वाढली हाेती. लग्न हाेऊन सासरी गेलेल्या मुलीही मतदान करण्यासाठी माहेरी आल्या हाेत्या. दिवसभर शांततेत व उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.
...
ऐनवेळी प्रकाशाची व्यवस्था
तालुक्यातील नऊ उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आली आहे. काही मतदान केंद्रांवर अंधार असल्याने मशीनवरील मतपत्रिका व्यवस्थित दिसत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या हाेत्या. त्या तक्रारींची तातडीने दखल घेत संबंधित मतदान केंद्रांवर प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली. वृद्ध व दिव्यांगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली हाेती. महिला मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. काेराेना संक्रमण लक्षात घेता, प्रत्येक मतदान केंद्रावर याेग्य उपाययाेजना करण्यात आल्या हाेत्या.