करुणाजनक : वृद्धेचा जीव गेला अन् मुलगा आरोपी बनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:47 PM2018-10-20T22:47:57+5:302018-10-20T22:48:42+5:30
निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ३० च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ३० च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.
गोरेवाडा वस्ती, उत्थाननगरात राहणारा आशिष महादेवराव चौधरी (वय २७) हा त्याची आई चंद्रकलाबाई (वय ६०) यांना शुक्रवारी सकाळी आपल्या मोटरसायकलवर बसवून कोंढाळीहून नागपूरला येत होता. नवीन काटोल नाका वळणावर वेग जास्त असल्याने खड्ड्यातून मोटरसायकल उसळली. परिणामी चंद्रकलाबाई खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुभांगी सुभाषराव गाडगे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चौकशी केली. अपघाताला आणि चंद्रकलाबाई यांच्या मृत्यूला आशिषचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आशिषविरुद्ध गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणा केल्यामुळे एकीकडे आशिषला त्याच्या आईला कायमचे गमवावे लागले तर दुसरीकडे एक गंभीर गुन्हाही त्याच्याविरुद्ध दाखल झाला.