नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:10 PM2018-05-19T23:10:17+5:302018-05-19T23:10:58+5:30
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार परिसरातील पिंडकापार (ता. रामटेक) शिवारात शनिवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार परिसरातील पिंडकापार (ता. रामटेक) शिवारात शनिवारी सकाळी घडली.
बिरसिंग बिरेलाल कोडवते (२८) व विहान बिरसिंग कोडवते (४) अशी गंभीर जखमी असलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. बिरसिंग हे पिंडकापार शिवारातील शेतात असलेल्या घरी राहतात. सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बिरसिंग हे तेंदूपत्ता संकलन व पाने बांधण्यासाठी लागणाऱ्या पानोळ्या आणण्यासाठी जंगलात जात होते. विहानने हट्ट धरल्याने त्यांनी त्यालाही सोबत घेतले आणि एमएच-४०/डीपी-७०१६ क्रमांकाच्या मोटरसायकलने जंगलाच्या दिशेने निघाले.
दरम्यान, मध्येच रस्त्याच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे दोघेही दुचाकीसह कोसळले. त्यात वाघाने दोघांवरही पंजाने प्रहार केले. शिवाय, कोसळल्याने विहानच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. वाघाने लगेच पळ काढताच दोघांनीही देवलापार येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. तिथे डॉ. राहुल कोडापे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले आणि नागपूर येथील मेयो रुग्णालयात त्यांना भरती करण्याची व्यवस्था केली. दोघांचीही प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
आर्थिक मदत मिळणार काय?
तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या कामगारांना ‘आम आदमी जीवन विमा’ योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी संबंधित कामगाराचे वय हे १८ ते ५९ वर्षांदरम्यान असावे. तो भूमिहीन असावा, असे स्पष्ट केले. मात्र, छोटे शेतकरीदेखील या हंगामात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात, त्यांचे काय, असा प्रश्नही निमित्ताने उपस्थित होतो. सदर कामगाराचा तेंदूपत्ता तोडताना अपघात झाल्यास त्याला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी दिले असून, तसा आदेश काढला आहे. प्रत्यक्षात अपघात झाल्यानंतरही एकाही कामगाराला लाभ देण्यात आला नाही. तेंदूपत्ता संकलनाला जाताना किंवा परतताना अशी घटना घडल्यास, त्यांना लाभ मिळतो की नाही, हे स्पष्ट केले नाही. या दोन्ही जखमींना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.