वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 12:29 PM2021-10-22T12:29:51+5:302021-10-22T12:41:03+5:30
वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले.
नागपूर : वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही. वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले, तसेच आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाला खावटीची रक्कम वाढवून दिली.
न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील आई-वडील दोघेही शिक्षक असून गंभीर मतभेदामुळे त्यांनी घटस्फोट घेतला आहे. ते विभक्त झाले त्यावेळी मुलगा आईच्या पोटात होता. त्यानंतर त्याचा जन्म झाला. आता तो सज्ञान झाला असून धनबाद येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचा आतापर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आईनेच उचलला. तिने काटकसर करून मुलाला वाढवले व शिकवले. दरम्यान, कुटुंब न्यायालयाने मुलाला २०१५ पासून मासिक पाच हजार रुपये खावटी अदा करण्याचे निर्देश वडीलास दिले होते. त्या निर्णयाविरुद्ध वडील व मुलगा या दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मासिक पाच हजार रुपये खावटी अवास्तव आहे, असे वडिलाचे म्हणणे होते, तर मुलाने वाढती महागाई लक्षात घेता खावटी वाढवून मागितली होती. उच्च न्यायालयाने मुलाची बाजू योग्य ठरवली.
मुलगा गुणवत्ताधारक विद्यार्थी असून तो आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. वर्तमान महागाईच्या काळात त्याला पाच हजार रुपयात सर्व खर्च भागविणे अशक्य आहे. करिता, तो पाेटगी वाढवून देण्यास पात्र आहे. वडील व्यवसायाने शिक्षक असून त्यांना सुमारे ४५ हजार रुपये वेतन आहे. त्यांनी वडील म्हणून मुलाच्या पालनपोषणाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे मासिक पाच हजार रुपये खावटी अवास्तव असल्याच्या दाव्यात अर्थ नाही, असे न्यायालयाने नमूद करून मुलाची खावटी वाढवून ७ हजार ५०० रुपये केली.
शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने उचलावा
मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च शिक्षणाच्या खर्चाचे नियोजन करावे, असे न्यायालय म्हणाले.
मुलगा सज्ञान, कधीही भेटा
मुलाला भेटू दिले जात नाही. त्यामुळे वाद आहे, अशी तक्रार वडिलाने केली होती. न्यायालयाने ही तक्रार निरर्थक ठरविली. मुलगा सज्ञान झाला आहे. त्यामुळे वडिलाने मुलाला भेटण्यास काहीच अडचण नाही. याशिवाय मुलगाही वडिलांना भेटू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.