फादर दिब्रिटो : साहित्यिक की धर्मप्रचारक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:39 AM2019-09-25T11:39:31+5:302019-09-25T11:46:57+5:30
२०२० मध्ये १०, ११ व १२ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या ९३ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोव्याचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उस्मानाबाद येथे नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोव्याचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. ते साहित्यिक असण्यासोबतच धर्मप्रचारक असल्याने आणि त्यांच्या नावापुढे ‘फादर’ ही ख्रिस्ती धर्मप्रचारकाची उपाधी असल्याने, अपेक्षित वादंगास सुरुवात झाली आहे. दिब्रिटो यांच्या साहित्यसृष्टीमध्ये बहुतांश लेखन ख्रिस्ती धर्म प्रसारासंदर्भातील आणि इतर धर्मांच्या चालीरीतींवर आक्षेप घेणारे असल्यामुळे, त्यांच्यावर ते खऱ्या अर्थाने साहित्यिक की रूढार्थाने धर्मप्रचारक, असे विचारले जाऊन ते कोणत्या भूमिकेतून संमेलनाध्यक्ष असणार, असा सवाल साहित्यसृष्टीतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून साहित्य संमेलनाची दिशा पूर्णत: वैचारिक आदान-प्रदानाकडून, वैचारिक मतभेदांकडे आणि आता ९३ व्या संमेलनाच्या रूपाने वैचारिक प्रतिद्वंद्वत्वाकडे वळल्याचे उघडउघड दिसून येते. विशिष्ट मतवादी साहित्यिकांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्यासोबतच, संमेलनांवर विशिष्ट वर्गाचे प्रस्थ निर्माण करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. २०१८ मध्ये आणि २०१९ मध्ये निर्माण झालेले वाद उघडउघड डाव्या आणि उजव्या विचारसरणीवरूनचेच होते, हेही स्पष्टच आहे.
आता २०२० मध्ये १०, ११ व १२ जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या ९३ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोव्याचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिब्रिटो हे मूळ ख्रिस्ती धर्मप्रचारक असल्याने, त्यांच्या लेखनाचा ओढा सर्वसाधारणपणे त्यांच्या कार्यवृत्तीला अनुसरूनच आहे. त्यांचे बहुतांश साहित्य आणि त्यांच्या शीर्षकावरून हे स्पष्टही होते. दिब्रिटो यांनी भारतीय संस्कृती आणि निसर्ग परंपरांवर प्रचंड आगपाखड केली असून, येथील परंपरांना गौण व मूर्खपणा आदी संबोधल्याचे सांगितले जाते. त्यावरून, मे.पु. रेगे यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारकांनीही दिब्रिटो यांचे वस्त्रहरण केल्याचे सांगितले जाते. शिवाय, सुजित भोगले व डॉ. अभिराम दीक्षित यांच्या लेखांतून दिब्रिटो यांची भारतीय संस्कृतीविरोधी मानसिकता उजेडात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याच गोष्टींचा प्रचार आता सोशल मीडियावर धडाक्याने सुरू असून, उस्मानाबाद साहित्य संमेलन, दिब्रिटो आणि त्यांची निवड करणाऱ्यांवर जोरदार प्रहार सुरू आहे.
गोंधळाचे सलग तिसरे संमेलन
२०१८ मध्ये पार पडलेल्या ९१ व्या साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने संमेलनासाठी बुलडाणा येथील हिवरा बाजारमध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद आश्रमाची निवड करण्यात आली होती. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्यानंतर आणि पुढे होणारा गोंधळ विचारात घेता, संमेलनाचे स्थळ हिवरा येथून बडोदा येथे हलविण्यात आले. २०१९ मध्ये यवतमाळ येथे पार पडलेल्या ९२ व्या संमेलनाला उद्घाटक म्हणून साम्यवादी विचारांच्या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनापूर्वी बरेच दिवस आधी त्यांचे उद्घाटनाचे लेखी भाषण सर्वत्र प्रसारित झाले आणि त्या भाषणावरून राजकीय गदारोळ माजला होता. यावरून, साहित्यवर्तुळात डावे आणि उजवे असे गट आमने-सामने आले आणि अनेकांनी आपापल्या गृहितांनुसार संमेलनावर बहिष्कार टाकून संमेलनाविरोधी प्रचार सुरू केला होता. विशेष म्हणजे, या दोन्ही साहित्य संमेलनाच्या नियोजनाची सर्व सूत्रे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याकडे होती. नयनतारा सहगल यांच्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे जोशी यांना राजीनामाही द्यावा लागला होता. आता महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील असून, ते सुद्धा जोशी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून असल्याचे दिसून येते.
आमचा लोकशाही मार्गाने निषेध
सर्वसमावेशक असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कट्टर वृत्तीच्या व्यक्तीला बसवणे, हा साहित्य महामंडळाचा आचरटपणा आहे. पु.भा. भावे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर, याच तथाकथित पुरोगाम्यांनी ते संमेलन गुंडगिरीने उधळून लावले होते. तसे आम्ही करणार नाही. मात्र, लोकशाही मार्गाने निषेध नक्की करतो. या संमेलनावर सर्व राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांनी, कविंनी, कलावंतांनी व विचारकांनी बहिष्कार घालण्याचे मी आवाहन करतो.
- अनिल शेंडे, ज्येष्ठ कवी
मुळात निवड पद्धतीच चुकीची
गेल्या वर्षीपासून सुरू झालेली निवड पद्धती पूर्णपणे चुकीची असून, याद्वारे अशा निवडी होणारच आहेत. निवडणूक पद्धतीने लोकांच्या मताचा आदर होतो, तो या पद्धतीमुळे होत नाही. आता जर दिब्रिटो यांचे योगदान निवड समितीला वाटत असेल तर, त्यांचा सन्मान केला जावा. त्यांना सन्मानाने वागणूक देणे, हे कर्तव्य आहे.
- मदन कुळकर्णी, ज्येष्ठ समीक्षक
महामंडळाने विचार करून निर्णय घ्यावा
मराठीला समृद्ध करणारे अनेक मोठे साहित्यिक आहेत. यापूर्वीही संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वोत्तम व्यक्तींची निवड झाली आहे. मात्र, यंदा कोणत्या निकषावर दिब्रिटो यांची निवड केली गेली हे समजण्यापलिकडचे आहे. त्यांचे काही ललितबंध आहेत. मात्र, मराठीला समृद्ध करावे, असे ते साहित्य नाही. बहुतांश लेखन ख्रिस्ती धर्मप्रचारासाठीचे आहेत. तेव्हा अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने पुन्हा एकदा विचार करून निर्णय घ्यावा.
- विश्वजित देशपांडे,
प्रदेशाध्यक्ष, परशुराम सेवा संघ
दिब्रिटो यांनी सामान्यांचे दु:ख मांडले
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सामान्यांचे दु:ख मांडले. ते वंचितांची सेवा करित आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्यांनी माणसांशी संवाद साधला आणि त्यांच्या संवेदनांवर फुंकर घातली. केवळ ते ख्रिस्ती आहेत म्हणून विरोध करणे चुकीचे. त्यांच्या निवडीमध्ये धर्मप्रसार दिसत नाही. तर, संमेलनाध्यक्ष म्हणून ते सर्वसामान्यांच्या व्यथा मांडतील. ही निवड योग्य वाटते.
- डॉ. जुल्फी शेख, निवृत्त प्राचार्य
धर्मप्रसार आणि संमेलनाचे व्यासपीठ वेगळे
फादर दिब्रिटो अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणे म्हणजे, ही एक इतिहासातील अपूर्व घटना आहे. जात, पंथ, धर्माचा विचार न करता त्यांनी भाषेची सेवा केली आहे. चांगले साहित्य निर्माण केले आहे. ज्यांचे आक्षेप ते धर्मप्रचारक असण्यावर असेल, त्यांनी तो विषय संमेलनाच्या व्यासपीठावर आणू नये, असे मला वाटते. यापूर्वीही वेगवेगळ्या आग्रहपूर्वक धार्मिक विचारांची मांडणी करणाऱ्यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी असले तरी, त्यांचा हिंदुत्ववाद त्यांच्या निवडीसाठी अडथळा ठरला नाही. त्याच भावनेने या घटनेकडे बघावे.
- डॉ. वि.स. जोग,
ज्येष्ठ साहित्यिक