वडिलाने मोबाईल घेऊन दिला नाही, मुलाने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:27 PM2020-08-03T20:27:41+5:302020-08-03T20:29:29+5:30
वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका युवकाने रागाच्या भरात स्वत:चे घर सोडले. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका युवकाने रागाच्या भरात स्वत:चे घर सोडले. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तन्मय शेखर जांभूळकर (वय १६) असे बेपत्ता मुलाचे नाव आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्वतीनगर वांजरा ले-आऊटमध्ये शेखर विनायक जांभूळकर राहतात. त्यांचा मुलगा तन्मय याने वडिलांना मोबाईल घेऊन मागितला. वडील टाळाटाळ करीत असल्यामुळे काही दिवसापासून मोबाईलसाठी तन्मयने हट्टच धरला. त्यावरून घरच्यांनी रागविले. त्यामुळे रागाच्या भरात तन्मय शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याची नातेवाईक तसेच मित्रमंडळीकडे विचारपूस केली. त्याबाबत कोणीच काही माहिती दिली नाही. त्यामुळेच शेखर जांभूळकर यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बेपत्ता तन्मयचा शोध घेतला जात आहे.