बाप रे बाप! वयाच्या १५व्या वर्षीच ‘दम मारो दम’; १५% विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर
By संतोष हिरेमठ | Published: May 31, 2024 06:46 AM2024-05-31T06:46:31+5:302024-05-31T06:47:44+5:30
जागतिक तंबाखू विरोधी दिन: ५२ टक्के विद्यार्थी व्यसनात; मुली ४३ टक्के, तर मुले ५७ टक्के
संतोष हिरेमठ/सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/छत्रपती संभाजीनगर: वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच मुले-मुली तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटच्या व्यसनाला बळी पडत आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येतो. एका संस्थेने राज्यातील ४ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्वेक्षण केले. यातील १३ ते १५ वर्षे वयोगटातील ३,७६५ मुलांचा अहवाल विचारात घेण्यात आला. यातून ५.१ टक्के तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करीत असल्याचे समोर आले. मुखकर्करोगाला तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत ठरतात.
१५% विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर
- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक योगेश सोळुंके म्हणाले की, ‘डब्ल्यूएचए’च्या अहवालानुसार धूम्रपान केल्याने रोज १४ जीव जातात.
- नागपुरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने हाती घेतलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २३ हजार ८० विद्यार्थ्यांच्या मुखाची तपासणी केली असता, ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले.
- यात मुलींचे प्रमाण ४३ टक्के, तर मुलांचे प्रमाण ५७ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, यातील १५ टक्के विद्यार्थी हे मुख पूर्वकर्करोगाच्या उंबरठ्यावर आहेत.
शाळेपासून जवळपास ५०० मीटर अंतरावर तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असावा. याचे गंभीरतेने पालन होणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांसमोर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये. महत्त्वाचे म्हणजे मुलांना या वस्तू विकत आणण्यास सांगू नये.
-डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
तंबाखूमुळे फुप्फुसाचा कर्करोग, दीर्घकालीन ब्रोन्कायटिस, एमेम्सीसेमा, हृदयविकार, कर्करोग, ल्युकेमिया, मोतीबिंदू, टाइप-२ मधुमेह, न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे तंबाखूचे व्यसन टाळावे.
- डॉ. निकिता गायकवाड, प्रकल्प अधिकारी, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था
आकडेवारी
- खर्रा- २२.४%
- तंबाखू- १४.५%
- बिडी व सिगारेट- २.५%
- सुपारी- २.४%
- पान- १.७%