वडिलांनी मुलाला दिले जीवनदान
By Admin | Published: January 28, 2017 01:44 AM2017-01-28T01:44:16+5:302017-01-28T01:44:16+5:30
मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३० वर्षीय मुलाला वडिलांनी स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले.
सुपरमध्ये दहावे किडनी प्रत्यारोपण यशस्वी
नागपूर : मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३० वर्षीय मुलाला वडिलांनी स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वडिलांनी दिलेल्या या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. सुपरमधील हे दहावे यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे.
मुलाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारे फुगुजी भांडारकर (५८) वडिलांचे नाव आहे, तर अनिल भांडारकर मुलाचे नाव. हे कुटुंब मूळ गोंदिया खामरी येथील आहे. अनिल हे मागील एक वर्षापासून डायलिसीसवर होते. वडिलांनी मूत्रपिंड दान करून मुलाला वाचवण्याचा निश्चय केला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. या शस्त्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी ‘किडनी युनिट’उभारण्याचे प्रयत्न केल्यामुळेच सुपरमध्ये हे शक्य झाले. यशस्वी किडनी प्रत्यारोपणात सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. समीर चौबे, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. मनीष बलवाणी, डॉ. नीलेश नागदिवे, डॉ. विशाल रामटेके व भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
मूत्रपिंड दात्याकडून रुग्णालयाला आगळी-वेगळी भेट
एकीकडे डॉक्टर व रुग्णांमधील नात्यांमध्ये तडे जात असताना दुसरीकडे शासकीय रुग्णालय असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात सौहार्दपूर्ण वागणुकीचा अनुभव आल्याने वनमाला उके या मूत्रपिंड दात्याने एलईडी टीव्ही संच नेफ्रोलॉजी विभागाला भेट स्वरूपात दिला. यावेळी रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.