वडिलांनी केली मुलीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:10+5:302021-02-24T04:08:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : पत्नीशी पटत नसल्याचा राग वडिलांनी पाेटच्या सात वर्षीय मुलीवर काढला. त्याने लग्नसमारंभातून मुलीचे अपहरण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पत्नीशी पटत नसल्याचा राग वडिलांनी पाेटच्या सात वर्षीय मुलीवर काढला. त्याने लग्नसमारंभातून मुलीचे अपहरण केले आणि गळा आवळून खून केला. ही घटना बुटीबाेरी नजीकच्या धवळपेठ शिवारात घडली असून, मंगळवारी (दि. २३) सकाळी उघडकीस आली आहे.
बिजली गजानन काळे (७) असे मृत मुलीचे तर गजानन माेहन काळे (२७) व माेहन काळे, रा. धवळपेठ, ता. नागपूर ग्रामीण असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वडील व आजाेबाचे नाव आहे. गजानन त्याची पत्नी ज्याेतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे पती-पत्नींमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. त्यामुळे ज्याेती बिजलीला साेबत घेऊन माहेरी गेली हाेती. ज्याेतीचे माहेरदेखील धवळपेठ येथीलच आहे.
गजानन ज्याेतीला घरी परत आणण्यासाठी अनेकदा त्याच्या सासरी गेला हाेता. मात्र, सासरे सूर्यभान काकडे यांनी मुलगी व नातीला त्याच्या साेबत पाठविण्यास नकार दिला हाेता. बिजली तिच्या आईसाेबत साेमवारी (दि. २२) बेला (ता. उमरेड) येथे लग्नाला गेली हाेती. तिथे गजाननही आला हाेता. दुपारी २ वाजतानंतर ती लग्नसमारंभातून अचानक बेपत्ता झाली. बिजली व गजानन सायंकाळपर्यंत विवाहस्थळी न पाेहाेचल्याने ज्याेतीने बेला पाेलीस ठाण्यात बिजली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
बेला पाेलिसांनी बेल्यासह धवळपेठ परिसरात बिजलीचा शाेध घेतला. पहाटेच्या सुमारास धवळपेठ शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि ३६३, ३६३, ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेन्ही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार शिवाजी भांडवलकर करीत आहेत.
....
लग्न समारंभातून अपहरण
बेला येथील गुरू आश्रमात लग्न असल्याने काळे व काकडे कुटुंबीय त्या लग्नासाठी साेमवारी (दि. २२) बेल्याला गेले हाेते. दुपारी २ वाजतापासून बिजली दिसत नसल्याने ज्याेती व नातेवाईकांनी तिचा शाेध घ्यायला सुरुवात केली. शिवाय, बिजली कुठेही गेली नसून, तिचे वडील गजानन तिला घेऊन गेल्याची माहिती आजाेबा माेहन काळे याने ज्याेतीला दिली हाेती. वास्तवात, गजाननची याेजना माेहनला माहिती हाेती. मात्र, त्याने चुकीची माहिती दिल्याने त्यालाही आराेपी करण्यात आले.