संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 11:19 AM2022-04-21T11:19:55+5:302022-04-21T11:33:58+5:30
आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या.
नागपूर : नागपुरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची विक्री करून बापाने चक्क बाईक, मोबाईल, कुलर नवीन कपड्यांसह इतर चैनीच्या वस्तूंची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापासह विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. उत्कर्ष दहिवले असे या निर्दयी बापाचे नाव आहे. मध्यस्थी करणारी आरोपी महिला उषा ही एका खासगी अनाथ आश्रमात काम करते. तर, उत्कर्ष नळफीटिंगची कामे करतो.
प्राप्त माहितीनुसार उत्कर्षने दुसरे लग्न केले. त्याच्या पत्नीला पहिल्या पतीपासून पाच वर्षांची मुलगी आहे. तर, उत्कर्षपासून तिला दुसरी मुलगी झाली, त्यामुळे उत्कर्ष नाराज होता. त्याने मुलीला विकण्याचा कट आखला, याला पत्नीने विरोधे केला पण आरोपीने पत्नी व मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईचा नाईलाज झाला. दरम्यान तो उषाच्या संपर्कात आला त्याने तिच्या माध्यमातून एका दाम्पत्याशी संपर्क साधला व मुलीची विक्री केली. उत्कर्षने १ लाख १० हजारांची मागणी केली. तर, उषा ही पेंदाम दाम्पत्याकडून परस्पर ३-५ लाख रुपये घेणार होती, अशी माहिती आहे.
आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या. दरम्यान, पत्नीने १५ एप्रिलाला पाचपावली पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी उत्कर्ष व उषा सहारेला अटक केली.