एकाच दिवशी पिता-पुत्राची अंत्ययात्रा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:51+5:302021-03-21T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचे सावट आ वासून दारावर उभे आहे आणि संसर्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचे सावट आ वासून दारावर उभे आहे आणि संसर्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कुठे कुठे तर सारे कुटुंबीयच कोरोनाने हिरावले आहे. असेच संकट हनुमाननगरातील झरबडे कुटुंबावर कोसळले आहे. कोरोना संक्रमणामुळे एकाच दिवशी पिता-पुत्राचा अंत्यविधी करण्याचे दुर्दैव नातेवाईकांवर आले.
डॉ. जगन्नाथराव झरबडे (९१) यांना श्वसनासंदर्भात त्रास होत असल्याने त्यांचा एकुलता एक मुलगा संजय (५४) यांनी त्यांना आयुर्वेदिक ले-आऊट येथील सूर्योदय रुग्णालयात भरती केले. पहिल्या दिवशी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. परंतु, दुसऱ्या दिवशी फुफ्फुसाचा संसर्ग वाढला आणि त्यातच १९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. यापूर्वी १५ मार्च रोजी संजय यांनाही श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांना त्याच परिसरातील वंजारी इस्पितळात दाखल करण्यात आले. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १७ मार्च रोजी त्रास वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९ मार्च रोजी वडिलांचे सकाळी १०.३० वाजता निधन झाल्यावर त्यांचा अंत्यविधी आटोपून येत नाही तोच संजय झरबडे यांचेही निधन झाल्याची वार्ता आली. एकाच दिवशी पिता-पुत्राच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. जगन्नाथरावांच्या मागे तीन मुली, सून, नातवंड तर संजय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
.............