वडील ‘दंडार’ करायचे, मी तेंदूपत्ता तोडायचो! प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 09:49 PM2019-02-28T21:49:10+5:302019-02-28T21:50:29+5:30
चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. मी स्वत: लिहित नाही तर तुम्ही मला लिहायला भाग पाडता, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी कारगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (भिवापूर ) : चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. मी स्वत: लिहित नाही तर तुम्ही मला लिहायला भाग पाडता, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी कारगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
कारगाव ग्रामपंचायत व धम्म मैत्रेय संघाच्यावतीने भिवापूर तालुक्यातील कारगाव येथे प्रेमानंद गज्वी यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती प्रेमानंद गज्वी, त्यांच्या पत्नी उमाताई गज्वी, रमेश डेकाटे, वैशाली डेकाटे, माजी सभापती तुलाराम गजभिये, काव्यकार इ. मो. नारनवरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना गज्वी यांनी कारगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास वाचनालय उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला. शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील युवकांना घडविण्याचा संकल्प व्यक्त करत ‘जे पेराल तेच उगवेल’ असे सांगितले. गावातील तेलीपुरा, कुणबीपुरा, बौद्धपुरा यांना एकत्र करून आपल्याला एक ‘गावपुरा’ करायचा आहे. ज्यामुळे जातीभेद नष्ट होतील. काम करायची इच्छा असेल तर यश हमखास पदरात पडते, असेही ते म्हणाले. इतर मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनात प्रेमानंद गज्वी यांचे कारगाव येथील बालपण ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कथन केला.
जन्म पिंपळगाव अन् बालपण कारगाव
प्रेमानंद गज्वी यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. मात्र बालपण भिवापूर तालुक्यातील कारगाव येथेच गेले. प्राथमिक शिक्षण घेताना शाळेतील शिक्षकांसोबत नाटकात काम करायचे... वडिलांचे कलागुण आणि शिक्षकांचे नाट्यप्रेम यातून प्रेमानंद गज्वी यांच्यातला नाटककार जन्माला आला. माध्यमिक शिक्षण उमरेड येथील जीवन विकास विद्यालयात झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.