१५० अनाथ, निराधार मुलींना बापाचा ‘जिव्हाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 07:00 AM2022-06-19T07:00:00+5:302022-06-19T07:00:10+5:30
Nagpur News २०१२ पासून आतापर्यंत १५० मुलींना नागपुरातील ‘जिव्हाळा’ने आधार देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे.
नागपूर : मी चौथीत असताना बाबांनी दारूच्या नशेत माझ्यासमोर आईला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली तर फाशीचा दोर तिच्या गळ्याला आवळला. तोही सैल करीत आई आम्हा तीन बहीण-भावंडांना घेऊन मामाच्या गावी आली. एवढे सर्व सांभाळणे मामालाही शक्य नव्हते. आकाशात झेप घेण्याची अपार इच्छा होती; पण परिस्थितीने पंख छाटले होते. कोरड्या वाळवंटात झाडाला नवी पालवी फुटावी तसे माझ्या आयुष्यात जिव्हाळ्याने उमेद फुलविली. ही व्यथा आहे सृष्टी राऊत हिची. सृष्टी सध्या बारावीला आहे आणि भविष्यात यूपीएससीची तयारी करणार आहे. हे बळ ‘जिव्हाळा’ने तिच्यात भरले आहे.
सृष्टीच नाही तर २०१२ पासून आतापर्यंत अशा १५० मुलींना ‘जिव्हाळा’ने आधार देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. यातीलच कोमल भगत ही उत्तम गायिका आहे. अस्मिता पाटील डान्स टीचर म्हणून कार्यरत आहे. अर्निका चाकमा हिने एमबीए करून ती अरुणाचल प्रदेशात बँकेत नोकरीला आहे. हर्षदा बोहरुपी ही बी-फॉर्म करीत आहे. बिरोबाबू चकमा ही बीएएमएम करीत आहे. धम्ममेधा पाटील ही फिजिओथेरेपिस्ट आहे. सुशिलानी, निमेंतारा, अर्जना या बीएससी करीत आहे. राणी माळोदे एमएससी, श्रृती बाराहाते, पेरीसा चकमा इंजिनिअरिंग, साक्षी माळोदे डीएमएलडी करीत आहे. या निराधार, एकल पालक व आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या मुली आहेत. या मुलींचे जीवन कधीकाळी अंधारलेले होते. त्यांना जिव्हाळ्याने मायेची ऊब दिली, संगोपनाची जबाबदारी घेतली आणि पायावर उभे केले.
- काय आहे हा जिव्हाळा?
जिव्हाळ्याचा मुख्य घटक आहे नागेश पाटील. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या संकल्पनेतून जिव्हाळ्याचा उदय झाला. सुरुवातीला पेपरची रद्दी हा जिव्हाळ्याला जगविण्याचा मुख्य स्त्रोत होता. घरोघरी रद्द गोळा करून त्याची विक्री करून मुलींना लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता होत होती. जिव्हाळ्याचे हे कार्य समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचले. काही मंडळींनी त्याला हातभार लावला. सीए महेश विचारे यांनी जिव्हाळ्याचे कार्य बघून वंजारीनगरातील आपल्या घराचे छत्र मुलींसाठी अर्पण केले; पण आजही रद्दी गोळा करण्याचा उपक्रम सुरू आहे. अतिशय सामान्य असलेले नागेश या शेकडो मुलींच्या उज्ज्वल भविष्याचे आधार ठरले आहेत. वर्ल्ड फादर डे निमित्त जिव्हाळ्याचे कार्य जाणून घेण्यासाठी ८६३७७१९३३६, ९७६३१५५८८५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.