शिक्षणावरील बापाचा आयुष्यभराचा खर्च अन् पोराचा एक वर्षाचा खर्च सारखाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 08:23 PM2023-06-13T20:23:47+5:302023-06-13T20:24:13+5:30
Nagpur News ज्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा ओतावा लागताे ताे पालकांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. साध्या वह्या- पुस्तकांसारख्या शालेय साहित्याच्या किमती पाहून डाेके गरगरणार नाही तर नवलच.
नागपूर : आज मुलांच्या साध्या काॅन्व्हेंट, केजीच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पाहता काेणत्याही बापाचे डाेळे पांढरे हाेतात आणि आपल्या पूर्ण शिक्षणासाठी लागलेल्या खर्चापेक्षा पाेराच्या एका वर्षाच्या शिक्षणाचा खर्च अधिक आहे, अशी भावना सहज त्या बापाच्या मनात येते. ही साधी भावना नाही तर प्रत्येक पालकाचे मनाेगत आहे. ज्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा ओतावा लागताे ताे पालकांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. साध्या वह्या- पुस्तकांसारख्या शालेय साहित्याच्या किमती पाहून डाेके गरगरणार नाही तर नवलच.
यंदापासून पुस्तकातच वहीची पाने देण्यात आली आहेत. वह्यासह, स्कूलबॅग, इतर साहित्य खूप महागले आहेत. प्रत्येक वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, मुलांच्या भविष्यासाठी पालकांना हा खर्च साेसावा लागताे आहे.
- वह्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले
गेल्या वर्षी कागदाचे दर वाढले हाेते. त्यानुसार कागदाच्या वस्तूंचे दरही २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. शालेय वह्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या, नाेटबुक्स उपलब्ध आहेत. कागदाच्या प्रतीनुसार त्यांचे दर ठरले आहेत. १०० पानाची वही २५ रुपये, २०० पानांची वही ३५ रुपये. गेल्यावर्षी या वस्तूंच्या विक्रीत १०० टक्के वाढ झाली होती. नोटबुक २५ ते १०० रुपये, रजिस्टर ५० ते १५० रुपये दर सध्या आहेत. ४०० ते ८०० रुपये डझनप्रमाणे वह्या उपलब्ध आहेत. २०० पानांची एक लाॅंगबुक ८० रुपयावर गेली आहे.
- अन्य साहित्यही महागले
यावर्षी पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जाेडली असली तरी विद्यार्थ्यांना अधिक वह्यांची गरज पडणारच आहे. याशिवाय स्कूल बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाॅटल, गणवेश, बूट घ्यावेच लागणार असून या साहित्यांच्या किमती काही पटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ४२५ पर्यंत मिळणारा नववीच्या पुस्तकांचा संच यंदा ५५० पर्यंत गेला आहे. दहावीचा संच ६६५ रुपयांवर गेला आहे.
स्कूल बॅग ४०० ते ५०० रुपये.
कंपास पेटी १२० ते १५० रुपये
बूट ५०० ते १,००० रुपये
गणवेश १,००० ते २,००० रुपये.
- शालेय साहित्य विक्रेत्याचा कोट
काेराेनानंतर कागदाच्या किमतीत माेठी वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी वह्या, नाेटबुक्स, पुस्तकांच्या किमतीत १०० टक्के वाढ झाली हाेती. यंदा मात्र १० ते २० टक्क्यांची किरकाेळ वाढ झाली आहे. यासह गणवेश, स्कूल बॅग, पेन, कंपास व इतर साहित्यांच्या किमती थाेड्या प्रमाणात वाढल्या आहेत.
- अर्जुनदास आहुजा, शालेय साहित्य विक्रेता
- शिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
शाळेची फी अव्वाच्या सव्वा झाली आहे आणि त्यात हा शालेय साहित्याचा खर्च परवडेनासा झाला आहे. इंग्रजी मीडियमच्या पहिल्या वर्गाच्या मुलासाठी २५ हजारांवर शाळेची फी आणि १० ते १५ हजार इतर खर्च करावा लागताे. पुढे वर्षभराचा खर्च वेगळाच.
- विवेक काकडे, पालक
मुलाच्या शिक्षणाचा खर्चामुळे पगारही पुरत नाही. शाळेची फी, वह्या- पुस्तके, कंपास पेटी, स्कूल बॅग, बूट या साहित्याचा खर्च लाखावर जाताे. वर्षभराचा ऑटाेचा खर्च, प्रात्यक्षिक, शाळेचे वेगवेगळे उपक्रम हे तर लागलेलेच असतात. पाेटाचीच काटकसर करावी लागते.
- राहुल मेश्राम, पालक