मुलींच्या पुढाकाराने वडिलांचे अवयवदान; तीन रुग्णांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 08:17 PM2021-12-17T20:17:31+5:302021-12-17T20:19:55+5:30
Nagpur News वडिलांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाल्यानंतर, त्यांना अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा निर्धार तीन बहिणींनी केला. झटपट निर्णय घेतले आणि अवयवदानाने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
नागपूर- परतवाडा : सर्व उपचार करूनही त्यांच्या वडिलांची प्रकृती खालवत गेली. डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले. कुटुंबावर शोककळा पसरली. या दु:खातही त्या तिन्ही मुलींनी आपल्या वडिलांच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. मानवतावादी या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.
राजुत पुरा, नांदगाव पेठ अमरावती येथील रहिवासी गजानन पंजाबराव कडू (६५) असे त्या अवयवदात्या वडिलांचे नाव. प्राप्त माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी कडू यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने, त्यांना परतवाडा येथील भन्साळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती त्यांच्या तिन्ही मुली मीनल काळे, माधुरी वानखेडे व प्रियांका लयास्कर यांना दिली. सोबतच अवयवदानचा सल्लाही दिला. वडिलांना अवयवरूपी जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी व सचिव डॉ.सजंय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीना वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
न्यू इरा हॉस्पिटलला यकृत, तर किंग्जवे हॉस्पिटलला मूत्रपिंड दान
कडू यांचे यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ५५ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आले. एक मूत्रपिंड किंग्जवे हॉस्पिटलमधील ४७ वर्षीय पुरुषाला तर दुसरे मूत्रपिंड ४७ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. यकृताचे प्रत्यारोपण डॉ.राहुल सक्सेना, डॉ.साहिल बन्सल व डॉ.स्नेहा खाडे यांनी केले. मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण डॉ.विशाल रामटेके, डॉ.प्रकाश खेतान, डॉ.वासुदेव रिधोरकर, डॉ.चंद्रशेखर चाम, डॉ.सचिन कुठे, डॉ.प्रज्वल महात्मे व डॉ.निहारिका यांनी केले.
ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने १९० किलोमीटरचा प्रवास
परतवाडा येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ते नागपूर हे १९० किलोमीटरचे अंतर कापण्यास जवळपास ४ तासांचा वेळ लागतो, परंतु दोन्ही मूत्रपिंडे व यकृत नागपुरात आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोअरची मदत घेण्यात आली. यामुळे दोन ते अडीच तासात अवयव नागपुरात पोहोचले. यात ३० ते ४० वाहतूक पोलिसांनी मदत केली.