चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी वडिलांचा संघर्ष

By admin | Published: January 10, 2015 02:36 AM2015-01-10T02:36:17+5:302015-01-10T02:36:17+5:30

सत्तर टक्के जळलेल्या साडेचार वर्षाच्या क्रिष्णाला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलाने अमरावतीहून नागपूर गाठले. मित्रांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केला.

Father's struggle to save his life | चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी वडिलांचा संघर्ष

चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी वडिलांचा संघर्ष

Next

लोकमत मदतीचा हात
नागपूर : सत्तर टक्के जळलेल्या साडेचार वर्षाच्या क्रिष्णाला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलाने अमरावतीहून नागपूर गाठले. मित्रांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केला. पैसे कमी पडत असल्याचे पाहता घरातील म्हैस, बकऱ्यासह सर्वकाही विकले. आता हातचे संपले क्रिष्णाला वाचविण्यासाठी आणखी दोन-अडीच लाखांची गरज आहे. क्रिष्णावर उपचार करण्याची कुटुंबाची परिस्थती राहिली नाही. त्यामुळे मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील रहिवासी असलेले देवीदास अडेकर असे त्या वडिलाचे नाव. तिवसा येथील एका सोनाराच्या दुकानात ते मजुरी करतात. तर क्रिष्णाची आई गृहिणी आहे. क्रिष्णाला वाचविण्यासाठी या दोघांची धडपड सुरू आहे. पण दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे.
देवीदास यांनी ‘लोकमत’ला आपली आपबिती सांगितली. १५ डिसेंबर रोजीची ही घटना आहे. सकाळच्यावेळी क्रिष्णा घरात खेळत होता. त्याची आई बाहेरचे काम करीत होती. स्टोव्हवर आंघोळीचे पाणी तापत होते. पाणी आणखी गरम व्हावे म्हणून क्रिष्णाने स्टोव्हचा पंप जोरात मारला. यात स्टोव्ह समोर ढकल्याने कृष्णाच्या अंगावर उकळलेले पाणी पडले. अख्खे शरीर भाजले. अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात क्रिष्णाला दाखल केले. डॉक्टरांनी ७० टक्के भाजल्याचे सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने नागपुरात घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. देवीदास यांनी मित्रांकडून पैसे उसने घेऊन नागपूर गाठले. धंतोलीतील चिल्ड्रेन हॉस्पीटलमध्ये क्रिष्णाला भरती केले. उपचार सुरू झाले. पैसा कमी पडत असल्याचे पाहता क्रिष्णाच्या वडिलाने घरातील म्हैस, बकऱ्या आणि जे विकण्यासारखे होते ते सर्व विकले. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास क्रिष्णा वाचेल, ही एकमेव आशा त्याचे वडील बाळगून आहेत.
क्रिष्णाला जगविण्यासाठी हवा माणुसकीचा धर्म
कोवळ्या वयातच नियतीचे कठोर आघात सोसण्याची वेळ निष्पाप क्रिष्णावर आली आहे. त्याला गरज आहे ती समाजाने मदतीचा हात देण्याची. हीच मदत त्याला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. क्रिष्णाला मदत करू इच्छिणाऱ्यांनी तिवसा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बँक खाते क्रमांक ३१६४६९०५३३६ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून करावी. देवीदास अडेकर यांच्याशी ९९२२५६३५७५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
क्रिष्णा प्रकृती गंभीर
साडेचार वर्षांचा क्रिष्णा ७० टक्क्यांवर भाजला आहे. प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावरील औषधांचा खर्च फार मोठा आहे. इस्पितळाकडून जे शक्य आहे ती मदत दिली जात आहे.
-डॉ. सतीश देवपुजारी

Web Title: Father's struggle to save his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.