फेटरी हे देशातील ‘मॉडेल’ गाव व्हावे
By admin | Published: September 14, 2016 03:12 AM2016-09-14T03:12:27+5:302016-09-14T03:12:27+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव देशातील ‘मॉडेल व्हीलेज’ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल,
अमृता फडणवीस : सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया संयंत्र बसविणार, १०० टक्के हागणदारी मुक्त गाव
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव देशातील ‘मॉडेल व्हीलेज’ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंगळवारी फेटरी येथील ग्रामस्थांना दिली. फेटरीच्या बार्बरा बहुउद्देशीय पॉलिटेक्निक विद्यालयाच्या सभागृहात त्यांनी योजनाचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी ही ग्वाही दिली.
आमदार समीर मेघे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पंचायत समिती सभापती नम्रता राऊत, सरपंच ज्योती राऊत, उपसरपंच प्रशांत पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अमृता फडणवीस म्हणाल्या, फेटरीला मॉडेल व्हीलेज बनविताना स्वच्छता, मुलीचे शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, बेरोजगारांना विविध कंपनीच्या मागणीनुसार कौशल्य शिक्षण याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. आपल्या गावात सर्व सोईसुविधा निर्माण व्हाव्यात अशी परिस्थिती आपण निर्माण करावी. जेणेकरून आपल्याला शहरात जाण्याची आवश्यकता भासू नये असे सांगत या सर्व बाबीची उपल्बधता करून देण्यासाठी तसेच कामे पूर्ण होण्यासाठी दर आठड्यास या गावास भेट देणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. आ. मेघे यांनी फेटरी गावाचे येत्या काही महिन्यांत रूप पालटेल, अशा पद्धतीने येथील विकासकामे करण्यात येईल. त्यासाठी ग्रामस्थांनीही मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश ढोमणे, प्रकाश लंगडे, योगिता परतेकी, रेखा ढोणे, किरण ताजणे, प्रभावती लंगडे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक शशांक दाभोळकर, जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे प्रमुख व गावातील नगारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सामाजिक जाणिवेतून केला ‘रॅम्पवॉक’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये ‘रॅम्पवॉक’ केला होता. हा ‘रॅम्पवॉक’ सामाजिक भावनेतून केला होता. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश होता, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कामगार यांच्या मुलामुलींनी तयार केलेल्या ‘हँडलूम’ वस्त्रांचे ‘प्रमोशन’ होते. सामाजिक कार्यासाठी पुढेदेखील असे प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करु, असेदेखील त्यांनी सांगितले.